दुष्काळी परिस्थिती, कमी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात चिंचेच्या झाडांना यंदा कमी प्रमाणात चिंचा लागल्या आहेत. यावर्षी चिंचेचे उत्पादन कमी असल्यामुळे बाजारात दर वाढले असले तरी चिंच उत्पादक शेतकऱ्यांना यंदाचे वर्ष आंबटच जाणार आहे.
जत पूर्व भागात शेताच्या बांधावर, पाटाजवळ, ओढ्यालगत चिंचेची अनेक झाडे आहेत. गतवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत मान्सून पाऊस झाला नाही. कमी पावसाने हवामान कोरडे होते. त्यामुळे जून महिन्यात चिंचेला फुलोरा आला नाही. झाडाला कमी चिंचा लागल्या. फेब्रुवारी, मार्चमध्ये चिंच पिकल्यानंतर तोड सुरू होते व दोन महिने त्याची आवक असते.
छोटे व्यापारी चिंच गोळा करून फोडून विक्रीसाठी घेऊन येतात. झाडावर चढून चिंच तोडणे, टरफल काढणे, फोडून चिंचोके काढणे आदी कामाची मजुरी परवडणारी नाही. दाक्षिणात्य राज्यात चिंचेचा सर्वाधिक उपयोग केला जातो. तेलंगणा, तामिळनाडू, हैदराबाद येथून चिंचेला मागणी आहे. गेल्यावर्षी ९ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. यावर्षी १२ हजार ते १७हजार रुपयांचा दर मिळत आहे.
सध्या ३० ते ३५ रुपये प्रति किलो दराने चिंचेची विक्री होत आहे. चिंचेची विक्री म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. थोड्या प्रमाणात चिंच विक्री होते. विक्रीपेक्षा नासाडी अधिक होत आहे. कमी पावसाने हवामान कोरडे होते. त्यामुळे चिंचेला फुलोरा आला नाही. - बसवराज पाटील, चिंच उत्पादक, शेतकरी.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील चिंच आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
17/05/2025 | ||||||
बार्शी | --- | क्विंटल | 262 | 9300 | 11500 | 10000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 40 | 6000 | 10500 | 8250 |
16/05/2025 | ||||||
बार्शी | --- | क्विंटल | 256 | 9300 | 12000 | 10000 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 78 | 8500 | 15500 | 12000 |