सोलापूर: येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
शनिवारी एका दिवसात तब्बल ७६२ ट्रक कांद्याची आवक झाली आहे. किमान दर १००, कमाल दर २५०० तर सर्वसाधारण दर १००० रुपये इतका मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्यासाठी पोषक असलेली थंडी वाढल्याने प्रतवारीत सुधारणा होऊन कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली.
त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीदेखील वाढली आहे.
सध्या बाजार समितीत केवळ लाल कांद्याची आवक सुरू असून, उच्च प्रतीच्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुरुवारी रात्रीपासून सोलापूर बाजार समितीत कांदा घेऊन येत असलेल्या गाड्यांची संख्या वाढली होती.
शुक्रवारी सकाळी १० वाजता लिलावास सुरुवात झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
दररोज ५०० गाड्यांच्या पुढेच येतोय माल...
◼️ सोमवारी ५३५, मंगळवारी ५०५, बुधवारी ५६३, शुकवारी ६७६ ट्रक कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला होता.
◼️ मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याची आवक वाढत असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.
◼️ मागील आठवड्यात आवक थोडी मंदावली होती.
◼️ मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे
कांदा निर्यातीत होतेय वाढ
◼️ दरम्यान, भारतीय कांद्याला आखाती देशांसह मलेशिया, सिंगापूर आणि बांगलादेशमधून मागणी कायम आहे.
◼️ तथापि, नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे काही देशांच्या सीमांवर निर्यातीचा वेग सध्या मंदावला आहे.
◼️ बांगलादेशकडेही सध्या मर्यादित प्रमाणातच कांदा निर्यात होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. शेतकऱ्यांना चांगला भावही मिळत आहे. आणखीन आवक वाढेल असा अंदाज आहे. चांगला भाव मिळत असल्याने अन्य राज्यांतील मालही सोलापुरात विक्रीसाठी येत आहे. - दिलीप माने, सभापती, बाजार समिती
अधिक वाचा: राज्यातील 'या' कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे राष्ट्रीयीकरण होणार; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
