मेथी, कोथिंबीर या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुरुवारी (दि. २५) सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या मेथी जुडीला कमीत कमी १ रुपया तर कोथिंबीर जुडीला ५ रुपये इतका निच्चांकी दर मिळाला. लागवड तसेच दळणवळण खर्चदेखील न सुटल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत मिळेल ते पैसे हातात घेत घरचा रस्ता धरला.
मेथी, कोथिंबीरपाठोपाठ कांदापातला १५ व शेपू भाजीला २० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे आवक वाढली आहे.
त्यातच परराज्यातील बाजारपेठेत स्थानिक शेतमाल दाखल होत असल्याने बाजारभाव घसरले आहेत. गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत कोथिंबीर जुड्यांची अंदाजे ५० हजार तर मेथी भाजीची १ लाख जुड्या आवक झाली होती. तर बाजारपेठेत स्थानिक शेतमाल दाखल होत असल्याने नाशिक बाजार समितीतून केवळ मुंबई व मुंबई उपनगरात शेतमाल रवाना केला जात आहे.
बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलाव प्रक्रियेत मेथी जुडीला कमीत कमी १ तर जास्तीत जास्त ५ ते १० रुपये, कोथिंबीरला ५ ते १० रुपये असा दर मिळाला आणि शेपू भाजीला १५ तर कांदापातला २० ते ३२ रुपये प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
