सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी ३५०० ते ४००० क्रेट (१० टन) डाळिंबाची आवक होत आहे. लिलावात उच्च प्रतीच्या भगव्या डाळिंबाला एका किलोस १७५ रुपये ते २०० रुपयेपर्यंत दर तर कमी प्रतीच्या डाळिंबाला ४५ रुपयेपासून पुढे प्रतवारीनुसार दर मिळत आहे. परंतु आवारात नंबर प्रमाणे लिलाव होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली आहे.
सांगोला तालुक्यात सध्या १८,२५० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. एकीकडे तेल्या, मर, कुजवा रोगाचे बांगावर गडद संकट असताना शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून बाजारपेठेतील महागड्या औषधाची झाडांवर फवारणी करून बागा जोपासतात.
सध्या मे महिन्यातील अंबिया व मृग बहारातील डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढली आहे. बहुसंख्य परप्रांतीय व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन प्रतवारीनुसार जागेवरच डाळिंब खरेदी करतात तर काही शेतकरी लिलावात डाळिंब घेऊन येतात.
पंढरपूर, अहिल्यानगर जतमधून आवक
सध्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, जत, कर्जत, जामखेडमधून ३५०० ते ४००० क्रेट डाळिंबाची आवक आहे. लिलावात प्रतवारीनुसार भगवा प्रतीचे डाळिंब १७५-२०० रुपये किलो दर, कमी प्रतीच्या डाळिंब ४५ रुपये ते प्रतवारीनुसार किलोला २०० रुपयेपर्यंत मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
नंबरप्रमाणे लिलावा अभावी फळ उत्पादकांना फटका
नंबरप्रमाणे डाळिंबाचे लिलाव होणे अपेक्षित असताना एकाचवेळी अनेक ठिकाणी लिलावामुळे डाळिंबाला अपेक्षित दर मिळत नाही. उलट इतर बाजार समितीमध्ये नंबरप्रमाणे लिलाव होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल आटपाडी, मंगळवेढा व पंढरपूर बाजार समितीत लिलावात घेऊन जात आहेत. दिवसेंदिवस डाळिंबाची आवक घटत चालल्याने भविष्यात सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील सौदे लिलाव बंद पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर