सांगली जिल्ह्याच्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यादरम्यान शेतकऱ्यांची व्यापारी व अडत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचा आरोप मनसे नेते अमोल काळे यांनी करत करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन बाजार समिती सचिव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, तासगाव येथील बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांच्या मालाची मोठ्या प्रमाणावर उधळण केली जाते. व्यापारी मालाची गुणवत्ता तपासण्याच्या नावाखाली प्रत्येक बॉक्समधून २ ते ३ किलो बेदाणा खाली टाकतात. हंगामात तीन ते चार हजार कलमांचा सौदा होत असून, त्यातून वर्षाकाठी सुमारे १००० टन बेदाण्याची उधळण होत असल्याचा आरोप केला आहे.
उधळलेला बेदाणा पुन्हा व्यापाऱ्यांकडून गोळा करून पॉलिश करून विकला जातो. यामधून व्यापाऱ्यांना कोट्यवधीचा फायदा होत असल्याचा दावा मनसेने केला आहे. दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या मालाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
बेदाणा सौद्याचे पैसे शेतकऱ्यांना ४० दिवसांनी दिले जातात. लवकर पैसे हवे असल्यास वटावाच्या नावाखाली २ टक्के रक्कम कपात केली जाते. बेदाण्याची उधळण बंद करणे, मालाची नासाडी रोखणे, तुटीबाबत स्पष्ट नियम लागू करणे, शेतकऱ्यांना पूर्ण पैसे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
...अन्यथा सौदे उधळून लावू
आठ दिवसात बेदाण्याची उधळण थांबली नाही तर बाजार समितीत खळखट्याक आंदोलन करून सौदे उधळून लावण्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
