सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या वर्षात कांद्याची आवक वाढली आहे. मंगळवारी ६२० ट्रक कांद्याची आवक झाली होती.
त्यामुळे मार्केट यार्डात सर्वत्र कांदाच पाहायला मिळत होता. मागील आठ दिवसांपूर्वी ३ हजारांपर्यंत दर गेला होता, मात्र मंगळवारी कमाल दर २३०० रुपये इतका मिळाला आहे. दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
दिवाळीनंतर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
त्यानुसार डिसेंबर महिन्यात दरात काही प्रमाणात वाढही झाली होती; मात्र काही दिवसांमध्येच दर घसरण सुरू झाली होती. निर्यातबंदी उठविल्यामुळे कांद्याचा चांगला दर मिळेल, असे वाटत असतानाच २५०० रुपयांवर दर जाईना.
नव्या वर्षात १ जानेवारीपासून दररोज ५०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक होत आहे. आवक वाढल्याने दरात घसरण होत आहे. मंगळवारी कमाल दर प्रतिक्विंटल २३०० रुपये इतका मिळाला. सरासरी दर मात्र १ हजारांवरच आहे.
चार दिवसात आवक
◼️ २ जानेवारी - ६७६ ट्रक
◼️ ३ जानेवारी - ७६३ ट्रक
◼️ ५ जानेवारी - ६९३ ट्रक
◼️ ६ जानेवारी - ६२० ट्रक
दोन महिने आवक राहणार
महापुरानंतर कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यातही कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे सोलापुरात पुढील दोन महिने मोठी आवक राहणार असल्याचे व्यापाऱ्यांतून सांगण्यात आले.
३० कोटींची उलाढाल
◼️ सोलापूर बाजार समितीत नव्या वर्षातील चारच दिवसात तब्बल ३० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
◼️ त्यात २ जानेवारीला ८ कोटी १२ लाख, ३ जानेवारीला ७ कोटी ६२ लाख, ५ जानेवारीला ६ कोटी ९३ लाख, ६ जानेवारीला ६ कोटी २० लाख रुपयांची कांदा बाजारात उलाढाल झाली आहे. त्यातून बाजार समितीला मोठ्या प्रमाणात सेस मिळत आहे.
अधिक वाचा: रेशन वाटपात गहू कोटा वाढविला तर तांदूळ घटविला; आता कुणाला मिळणार किती धान्य?
