सोलापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्डातील हमाल शुक्रवारीही संपावरच होते. बुधवारी रात्री आलेल्या कांद्याचा शुक्रवारी लिलाव झाला, तेव्हा हमालांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली.
तेव्हा पोलिसांसोबत किरकोळ वाद झाला. लिलावानंतर गाड्या भरणार नाही, अशी भूमिका हमालांनी घेतली. त्यामुळे सुमारे ७ कोटी ७३ लाख किमतीचा कांदा यार्डात पडून आहे. तसेच शनिवारीही लिलाव बंद राहणार आहे.
सोलापूर बाजार समितीत गुरुवारी पहाटेपासून हमालांचे आंदोलन सुरू आहे. गुरुवारी दिवसभर कांद्याचा लिलाव झाला नाही. यावेळी शेतकऱ्यांनी आलेला माल स्वतः उतरवला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कशीबशी लिलावाची प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, काही हमालांनी लिलाव होऊ देणार नाही, माल उचलणार नाही, अशी भूमिका घेतली. तेव्हा जेलरोड पोलिसांनी हस्तक्षेप करून लिलाव सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र, तोडगा निघाला नाही.
बाजार समितीच्या कार्यालयात दुपारी दोन तास बाजार समितीचे अधिकारी, पोलिस, कांदा व्यापारी आणि हमालांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीतही हमालांनी गाड्या भरणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यामुळे तोडगा निघाला नाही.
त्यानंतर दुपारी पुन्हा केदार उंबरजे यांनी हमालांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हमालांनी शनिवारी सकाळी गाड्या भरू, असे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी कांदा पडूनच राहिला आणि शनिवारीही लिलाव बंद ठेवण्यात आला आहे.
व्यापारी अन् खरेदीदारांना फटका
हमालांच्या संपामुळे गुरुवारी शेतकऱ्यांना त्रास झाला, काही परवानाधारक हमाल आणि शेतकयांनी स्वतः माल उतरवल्याने शुक्रवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. खरेदीदारांनी व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून कांदा खरेदी केला. मात्र, सर्व कांदा सध्या यार्डात पडून आहे. बुधवारी रात्री आलेला कांदा दोन दिवस यार्डात पडून आहे.
परवानाधारक हमालांची यादी द्या
बैठकीत तोडगा न निघाल्यानंतर पोलिसांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडे परवानाधारक हमालांची यादी द्या, त्यानंतर इतरांचा बंदोबस्त करू, अशी भूमिका पोलिसांनी मांडली. त्यानंतर यादी देणार असल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्याांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या दोन्ही गेटवर आणि कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
प्रशासकांसमवेत आज व्यापाऱ्यांची बैठक
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांची शनिवारी प्रशासक मोहन निंबाळकर यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात ठोस भूमिका ठरविण्यात येणार आहे. वारंवार होणाऱ्या संपामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. असे सांगण्यात आले.
अधिक वाचा: नवी मुंबई बाजार समितीत नव्या कांद्याची आवक वाढली; मागील पंधरा दिवसांत कसा राहीला दर