सोलापूर : परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध नोंदवित बुधवारी मध्यरात्रीपासून अचानकपणे माथाडी कामगारांनी पुकारला.
या संपामुळे बाजार समितीमध्ये आलेल्या ४०० ट्रक कांद्याचा लिलाव गुरुवारी होऊ शकला नाही. दरम्यान, संतप्त झालेल्या कामगारांनी व शेतकऱ्यांनी पुणे हैदराबाद महामार्ग रोखला. यामुळे काही तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
डॉ. आंबेडकरांबद्दलच्या विधानाचे पडसाद बुधवारी सायंकाळपासूनच सोलापुरातही उमटले. बुधवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी निषेध आंदोलन करून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी अचानक संप पुकारला.
शेतकऱ्यांनी रोखली महामार्गावरील वाहतूक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्त्तव्याच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी अचानक सोलापूर बाजार समितीमध्ये आलेली शेतमालाची वाहने उतरून घेण्यास नकार देत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे कांदा विक्रीसाठी घेऊन आलेले ट्रक थांबून होते. शेतकऱ्यांनी पहिले कांदा लिलाव सुरू करा आणि कांद्याचे ट्रक उतरून घ्या, म्हणत शेतकऱ्यांनी देखील सोलापूर-हैदराबाद मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले.
'जय जवान, जय किसान'च्या घोषणा
शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर तसेच पुणे-हैदराबाद रस्त्यावर आंदोलन केले, यावेळी 'जय जवान, जय किसान', 'शेती मालाचा लिलाव सुरू करा अशा विविध घोषणा दिल्या. लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी लिलाव न झाल्याने शुक्रवारच्या लिलावासाठी गाड्या न आणण्याची विनंती बाजार समितीने केली.
गाड्या रिकाम्या करण्यास रात्री उशिरा केला प्रारंभ
अचानक झालेल्या संपामुळे विक्रीसाठी आलेल्या कांद्याच्या ४०० गाड्यांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या. गुरुवारी रात्री उशिरा कांद्याच्या गाड्यांमधील माल उत्तरविण्यास माथाडी कामगारांनी सुरुवात केली. काही मालाचे लिलाव गुरुवारी रात्री उशिरा झाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांचा बंदोबस्त
अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे शहर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आंदोलन शांततेत करण्याबरोबरच वाहतूककोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. विविध पातळीवरील चर्चेत पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुरुवारी दिवसभर बाजार समितीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतमालांचे लिलाव ठप्प
१) कांद्यासोबत अन्य मालाचा लिलाव गुरुवारी होऊ शकला नाही. बाजार समिती प्रशासकांना लिलाव चालू करण्याची विनंती केली.
२) मात्र, माथाडी कामगारांनी बाजार समितीमध्ये आलेला माल खाली न केल्याने गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कांद्यासह इतर शेतमालांचे लिलाव ठप्प झाले होते.
३) माथाडी कामगार भीमराव सीताफळे, संकेत मस्के, राजू धनाने, किरण मस्के, संदीप कांबळे, सुनीता रोटे, दत्ता मुरुमकर यांनी संपासाठी पुढाकार घेतला.