सोलापूर : सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात कांदा खरेदी विक्री करणारे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून पुढे येऊ शकते.
यासंदर्भात आज राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
राज्यात लासलगाव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्वी कांद्याच्या खरेदी विक्रीत आघाडीवर होत्या गेल्या सात आठ वर्षांपासून या दोन्ही बाजारपेठांची मक्तेदारी मोडीत काढीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याच्या व्यापारात उच्चांक प्रस्थापित केला आहे.
कांद्याच्या हंगामात प्रतिदिन १२०० ते १५०० ट्रक कांद्याची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होते.
त्याच दिवशी संपूर्ण कांद्याची विक्री आणि शेतकऱ्यांना मालाची पट्टी देण्याची बाजार समितीची परंपरा असल्याने राज्यभरातील कांदा उत्पादक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घेतात.
ही वस्तुस्थिती असल्याने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक बोलावली.
सभापती दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला बाजार समितीचे संचालक नागन्ना बनसोडे, वैभव बरबडे, मुश्ताक चौधरी, माजी संचालक केदार उंबर्जे, कांद्याचे व्यापारी नसीर अहमद खलिफा, रेवणसिद्ध आवने, महानिंगप्पा परमशेट्टी, श्रीशैल अंबारे यांच्यासह व्यापारी संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.
कांदा टर्मिनल संदर्भात चर्चा
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची होणारी आवक पाहता कांदा हब म्हणून सोलापूरची ओळख निर्माण होत आहे.
कांद्याची साठवण गरजेचे असून त्यासाठी सोलापुरात कांदा टर्मिनल उभारण्याची सूचना पाशाभाई पटेल यांनी यावेळी बोलताना केली. त्या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यावर एकमत झाले.
सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची खरेदी विक्री होते. कांद्याच्या हंगामात मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ वाढते त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या कृषी विभागाची मुळेगाव हद्दीतील शेती शाळेची जमिनीची बाजार समितीने मागणी केली आहे. राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून जमीन उपलब्ध झाल्यास स्वतंत्र कांदा बाजार उभारण्याची सोलापूर बाजार समितीची तयारी आहे. - दिलीप माने, सभापती, श्री सिद्धेश्वर बाजार समिती
अधिक वाचा: तुकडेबंदी नियमित करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती तयार झाली; होणार 'हे' पाच फायदे
