Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sitafal Market : यंदाचा सीताफळ हंगाम अंतिम टप्प्यात; पुणे बाजार समितीत कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:53 IST

sitafal market pune यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे.

पुणे : सीताफळ हे सर्वांनाच आवडणारे फळ आहे. त्यामुळे या फळाला घाऊक आणि किरकोळ बाजारात ग्राहकांकडून मागणी असते.

यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे.

दिवसेंदिवस आवक कमी होणार असून, डिसेंबरमध्ये हंगाम पूर्णतः संपणार आहे, अशी माहिती फळ व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

सद्य:स्थितीत बाजारात सुमारे एक टन सीताफळाची आवक होत आहे. त्यास प्रतिकिलोला ३० ते १७० रुपये दर मिळत आहे. लांबलेल्या पावसामुळे ज्या बांगात उशिराने फळे आली, त्या बागातील आवक आता सुरू आहे.

त्यामुळे आवक कमी असून दिवसेंदिवस ही आवक कमी होत जाणार आहे. आवक कमी असली, तरी फळाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे दरही चांगला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सीताफळाची आवक सुरू झाली होती. पावसामुळे झाडांना फळधारणा कमी असल्यामुळे यंदाच्या हंगामात ५ ते ६ टनापेक्षा अधिक आवक झाली नाही.

पाऊस थांबल्यानंतर चांगला माल बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दरातही वाढ झाली होती. पाऊस थांबल्यानंतर सीताफळाला मालाच्या प्रतवारीनुसार १५ ते १५० रुपये दर मिळाला.

यंदा ग्राहकांकडून चांगली मागणी होती. मात्र, माल कमी होता. फळबाजारात जिल्ह्यातील वडकीनाला, फुरसुंगी, सासवड येथून आवक झाली, तसेच अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातूनही सीताफळाची आवक झाली.

आवक कमी असल्यामुळे इतर राज्यात अधिक माल गेला नाही. राज्यातील पर्यटन स्थळावरून मात्र चांगली मागणी होती, असेही अरविंद मोरे यांनी सांगितले.

गोल्डन सीताफळ येणार◼️ गावरान सीताफळाप्रमाणेच गोल्डन सीताफळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे.◼️ सद्यस्थितीत घाऊक बाजारात प्रतिकिलोला दर्जानुसार ५ ते ५० रुपये दर आहे.◼️ या हंगामात गोल्डन सीताफळाचा दर्जा अधिक चांगला नसला तरी या हंगामात सर्वाधिक १० ते १२ टनाची आवक झाली.◼️ पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातून आवक झाली.

कर्नाटक आणि गुजरात या राज्यातून या सीताफळाला चांगली मागणी होती. आवक संपत आली आहे. मात्र, सध्या तुरळक प्रमाणात काही दिवस सीताफळ आवक राहणार आहे. - अरविंद मोरे, मार्केटयार्ड

अधिक वाचा: तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात यंदा किती रुपये येणार?

टॅग्स :फळेबाजारमार्केट यार्डशेतीशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेअहिल्यानगरसोलापूरपाऊस