पंढरपूर : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या कचाट्यातून सुटका झाल्यानंतर मार्केटिंगच्या द्राक्ष मालाचा तुटवडा जाणवत आहे.
मार्केटिंगच्या द्राक्षांचा ७० ते ७५ रुपयांवरील दर आता १०० ते ११० रुपयांवर पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सरकोली येथील द्राक्ष चीन व मलेशियाला निर्यात होत आहेत. पंढरपूर तालुक्यात उसानंतर सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यानंतर केळी, डाळिंब, चिकू, आंबा आदी फळबागांचे क्षेत्र आहे.
कासेगाव, करकंब, भाळवणी, सुस्ते, तुंगत, सरकोली, खर्डी परिसरात द्राक्ष बागांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा फटका काही वर्षापासून बसत आहे.
हातातोंडाला आलेली पिके कवडीमोल भावाने विकल्याचा इतिहास असताना यावर्षी अवकाळी पावसाचा तडाखा बसूनही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रथमच समाधानाचे वातावरण आहे.
द्राक्ष लागवडीपासून प्रथमच उच्चांकी दर
◼️ सरकोली (ता. पंढरपूर) येथे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भोसले व त्यांचे बंधू सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सुधाकर भोसले यांच्या शुगर फ्री द्राक्षाला यावर्षी १२० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.
◼️ ही द्राक्ष चीन, मलेशिया देशांमध्ये निर्यात होत आहेत.
◼️ द्राक्ष लागवडीपासून प्रथमच १२० रुपये दर मिळत असल्याचे डाळिंब पुरस्कार विजेते शेतकरी दत्तात्रय भोसले यांनी सांगितले.
सात वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि दराच्या अनिश्चिततेमुळे द्राक्ष बाजारात उत्पादन खर्चही निघत नव्हता. यावर्षी अवकाळीतून वाचलेल्या द्राक्षांना ८० ते ११० रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळत आहे. सध्या मालाचा तुटवडा असल्यामुळे दरात वाढ होत आहे. - अजित पवार, द्राक्ष उत्पादक, कासेगाव
अधिक वाचा: द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये
