सारंगखेडा (जि. नंदुरबार) येथील यात्रेतील घोडे बाजारातील उलाढालीचा गेल्या वर्षाचा विक्रम यंदा मोडीत निघाला. यंदा तीन कोटी ८६ लाख दोन हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली तर गेल्यावर्षी तीन कोटी ८४ लाख ९८ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली होती. यंदाही देशभरातून उमदे घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
पैकी तब्बल तीन हजार घोडे येथे विक्रीसाठी उपलब्ध होते. ज्यात राज्यभरातील तसेच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश अशा शेजारील राज्यातून देखील मोठे खरेदीदार या ठिकाणी दाखल झाले होते. या अश्व शौकिनांनी येथून तब्बल ७०२ घोडे खरेदी केले आहेत. दरम्यान बुधवारी १८ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीच्या ३२ घोड्यांची विक्री झाली.
विशेष की, गेल्यावर्षी १,८१० घोडे विक्रीसाठी आणले गेले होते. त्यापैकी ८५७ घोड्यांची विक्री होऊन त्यातून तीन कोटी ८४ लाख ९८ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली होती. यामुळे गेल्यावर्षीचा उलाढालीचा विक्रम यावर्षी मोडला आहे. ज्याची चर्चा सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात होते आहे.
