पिंपरी : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावासाठी भाताची विक्री करणे सुलभ झाले आहे. कारण मावळ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विविध माध्यमातून कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून भात खरेदी केली जात आहे.
भाताला बाजारात १६ ते १८ रुपये प्रतिकिलो असा दर मिळत होता. शिवाय शेतकऱ्यांना स्वखर्चाने व्यापाऱ्यांच्या दुकानात किंवा गिरणीवर भात न्यावा लागत होता.
गेली तीन वर्षांपासून विविध कार्यकारी सहकारी संस्था, मावळ अॅग्रो कंपनी थेट शेतकऱ्यांकडून भात खरेदी करीत आहे. यामुळे पिळवणूक, आडतदार, दलाल, हमाली या सर्वांपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी सोसायट्यांनी भाताला ३० ते ३२ रुपये दर दिला. - तुकाराम आगळमे, शेतकरी, साते
यंदा १५ नोव्हेंबरपासून भात खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्याऐवजी मावळ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या बैठकीत भाताचा दर जाहीर केला जाणार आहे. विविध सेवा सहकारी संस्थांकडून भात खरेदी केला जाणार आहे. - माऊली दाभाडे, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
शासनाने यावर्षी सामान्य भाताला २३६९ रुपये, तर अ दर्जाच्या भाताला २३८९ रुपये दर निश्चित केला आहे. मावळात यंदा भाताच्या दर्जा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणी आणि भरडताना काळजी घ्यावी. - मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी, मावळ
अधिक वाचा: बिबट्याची दहशत वाढली; ग्रामस्थांवर आली गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ
