मागणी व पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत लाल कांद्याच्या मागणीत वाढ झाली असून नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला सर्वोच्च असा ३ हजार २२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर लाल कांद्यानी तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
सोमवारी निघालेल्या बाजारभावाच्या तुलनेत गुरुवारी (दि.१३) पाचशे रुपयांनी वाढ झाली असून कांद्याला सर्वोच्च असा ३२२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांनंतर कांदा दराने तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी दसरा-दिवाळीनंतर मागील हंगामातील उन्हाळी कांद्याची आवक कमी होऊन बाजारात नवीन लाल कांद्याची आवक होण्यास सुरुवात होते; परंतु मागील वर्षी परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी ऑक्टोबर महिन्यात लाल कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर पाच ते सहा रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तेजीत होते.
डिसेंबर महिन्यात लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने मागणीत घट येऊन अवघ्या आठ दिवसांतच पाच हजार प्रतिक्विंटल विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर निम्म्याने कमी होत २५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
बाजारातील आवक कमी
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून आवक स्थिर असल्याने कांद्याचे दरही २००० ते २७०० रुपयांपर्यंत स्थिरच होते; परंतु अंतिम टप्प्यात काढणीला असलेला लाल व पोळ कांदा चालू आठवड्यात कमी प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने निम्म्याने आवक घटली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत लाल कांद्याची मागणी वाढली.
दर राहणार तेजीत
सद्यःस्थितीत शेतकऱ्यांजवळ असलेला लाल पोळ कांदा हा अंतिम टप्प्यात असल्याने कांदा आवकेत घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढल्याने लाल कांद्याचे दर तेजीत आले आहेत. जोपर्यंत रब्बी हंगामातील उन्हाळी गावठी कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत लाल कांद्याचे दर तेजीतच राहतील, असा अंदाजव्यापाऱ्यांनी व्यक्त केला.