मराठवाडा आणि विदर्भातील हळद खरेदी-विक्रीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड दहा दिवसांच्या बंदनंतर सोमवारपासून पर्ववत सुरू होणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आदल्या दिवसापासूनच हळद घेऊन मार्केटयार्ड गाठले. रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ३२० वाहनांतून सुमारे १२ हजार क्विंटल हळदीची आवक झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
मार्केट यार्डात दाखल झालेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. हळदीची वाढती आवक लक्षात घेता सध्या उपलब्ध हळदीचे बीट आणि मोजमाप पूर्ण करण्यासाठी जवळपास आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ४ मे रोजी दाखल होणाऱ्या वाहनांतील हळदीचे बीट आणि मोजमाप पूर्ण होण्यासाठी दुसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. हळदीची आवक वाढल्यामुळे मागील आठवडाभर शनिवार व रविवार वगळता मार्केट यार्डातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
त्यापूर्वी हळदीला १३ हजार ते १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. मात्र लागवड खर्च, मजुरी, वाहतूक आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा भात समाधानकारक नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.
आता दहा दिवसांच्या बंदनंतर हळदीचे बीट सुरू होत असताना समाधानकारक दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आणि नियोजन
गेल्या आठवडयात शेतकऱ्यांनी मोजमाप आणि नियोजनाबाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्वतः मार्केट यार्डाला भेट देऊन पाहणी केली होती.
शेतकऱ्यांचा मुक्काम वाढणार नाही आणि त्यांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. जेवढ्या मालाचे मोजमाप एका दिवसात शक्य आहे. तेवढीच आवक मर्यादित ठेवा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आता बाजार समितीकडून नियोजन करण्यात येत आहे.
काट्यासाठी लागणार पाच ते सहा दिवस
मार्केट यार्डात दररोज सुमारे अडीच हजार क्विंटल हळदीचे मोजमाप होऊ शकते. रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल १२ हजार क्विंटलची आवक झाली. त्यामुळे या हळदीचा लिलाव आणि वजनकाट्यासाठी पाच ते सहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी शनिवारनंतर हळद घेऊन मार्केट यार्डात याये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
सर्व वाहनांना मार्केट यार्डात प्रवेश
हळद घेऊन आलेली वाहने पूर्वी मार्केट यार्डाबाहेर रस्त्यावर उभी राहत होती. त्यामुळे हळद चोरीस जाणे, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे बाजार समितीने रविवारी दुपारपर्यंत दाखल झालेल्या सर्व वाहनांना मार्केट यार्ड आवारात प्रवेश देण्यात आला.
किमान १५ ते १६ हजारांचा भाव अपेक्षित
मार्केट यार्डात आतापर्यंत हळदीला १३ हजार ते १४ हजार ५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र, वाढलेला मजुरी खर्च, खते आणि लागवडीचा खर्च पाहता हा भाव परवडणारा नसल्याची भावना शेतकन्यांमध्ये आहे. किमान १५ ते १६ हजार रुपये दर मिळावा, अशी शेतकऱ्याऱ्यांची अपेक्षा आहे.
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
