पुणे : अक्षय्य तृतीये निमित्ताने आंबा खरेदीसाठी रविवारी गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्याने फळबाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
मात्र, मागणीच्या तुलनेत 'तयार' नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांना देवगड हापूसऐवजी पर्यायी कर्नाटक हापूसचा आधार घ्यावा लागला.
देवगड हापूसचा कच्चा माल शिल्लक असल्याने अनेक ग्राहकांनी आंबा न घेता काही दिवस वाट पाहण्याचाही पर्याय निवडला आणि आंबा न घेताच माघारी गेले असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात हापूस आणि पायरी आंब्याला मागणी असते. यंदा मात्र ग्राहकांना हवा तसा तयार माल मिळत नाही.
सध्या बाजारात प्रामुख्याने रत्नागिरी, देवगड या कोकण पट्ट्यातील हापूससह कर्नाटक हापूसची मोठी आवक होत आहे.
महागाईमुळे हापूसच्या दराचा उडाला भडका
◼️ तयार आंब्याची उपलब्धता कमी असल्याने आणि मागणी प्रचंड असल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ आहे.
◼️ घाऊक बाजारात हापूसच्या एका पेटीचे दर त्यांच्या आकारानुसार आणि गुणवत्तेनुसार २,५०० ते ५,००० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे.
आता पर्यायी म्हणून कर्नाटक हापूसचा आधार
◼️ कोकण हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक ग्राहक कर्नाटक हापूसकडे वळत आहेत.
◼️ चवीला मध्यम आणि दिसायला आकर्षक असलेल्या या आंब्यालाही रविवारी मोठी मागणी झाली.
◼️ कर्नाटक हापूसची आवक समाधानकारक असली तरी, तयार मालासाठी ग्राहकांना कर्नाटक हापूसचा आधार घ्यावा लागला.
असे आहेत दर
◼️ हापूस : ३ डझन पेटी : १००० ते १६०० रुपये.
◼️ पायरी ४ डझन : ७०० ते १००० रुपये.
◼️ लालबाग : ३० ते ६० रुपये प्रति किलोप्रमाणे.
◼️ बदाम आंबा : ५० ते ७० रुपये प्रतिकिलो.
पुणे मार्केट यार्डात दर रविवारी गर्दी असतेच, पण आज आंब्यासाठी विशेष ओघ होता. ग्राहकांना तयार आंबा हवा असतो. मात्र, देवगड, रत्नागिरी हापूस आंबा प्रमाण कमी होते. तयार आंबा उपलब्ध नव्हता. त्यामुळे ग्राहकांनी पर्यायी म्हणून कर्नाटक आंबा खरेदी केला. हा आंबा हापूस आंब्यासारखाच असतो मात्र चवीला थोडा कमी गोड असला तरी खायला चांगला आहे. पुढील १५ दिवसांत आवक वाढल्यानंतर आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे. - रोहन उरसळ, कर्नाटक आंबा आडते मार्केट यार्ड
अधिक वाचा: बाजारात शाळू ज्वारीपेक्षा मालदांडी ज्वारीला अधिक पसंती; वाचा प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?
