राज्यात गतवर्षी कमी पावसामुळे ज्वारीचे उत्पादन घटले असून त्याचा परिणाम बाजारातील दरावर दिसत आहे. आवक कमी झाल्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे.
पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या ज्वारीच्या भाकरीकडे लोकांचा कल वाढत असल्याने मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी, ज्वारीचे दर आता गव्हालाही मागे टाकत आहेत.
स्थानिक बाजारात सध्या ज्वारी-शाळूचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून सर्वसामान्यांच्या जेवणातील भाकरी आता महाग झाली आहे, तर गव्हाची पोळी तुलनेने स्वस्त ठरत आहे. व्यापाऱ्यांकडे उपलब्ध साठा कमी आहे.
पावसाचे प्रमाण कमी; पेरा अन् उत्पादन घटले
◼️ यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे ज्वारीचा पेरा आणि उत्पादन घटले.
◼️ त्यामुळे बाजारात लक्षणीयरीत्या ज्वारीची आवक कमी झाली आहे.
◼️ साठा मर्यादित असल्याने दरात वाढ होत आहे.
बाजारातील ज्वारीचे प्रतिक्विंटल भाव (₹)
◼️ मालदांडी ज्वारी - ४१०० ते ४५००
◼️ शाळू ज्वारी - ३८०० ते ४२००
◼️ हायब्रीड ज्वारी - ३००० ते ३६००
◼️ पांढरी ज्वारी (लोकल) - ३५०० ते ४०००
◼️ लाल ज्वारी - ३२०० ते ३८००
◼️ पीक दर्जानुसार - ४५०० ते ४८००
भाकरी पचायला हलकी
◼️ उन्हाळ्याच्या दिवसांत ज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि शरीराला थंडावा देणारी मानली जाते.
◼️ त्यामुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातही तिची मागणी वाढत आहे.
◼️ आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याने अनेक जण गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारीच्या भाकरीकडे वळत आहेत.
◼️ डायट करणारे आणि फिटनेसप्रेमी लोक ज्वारीला अधिक पसंती देत आहेत.
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
