पारंपरिक पिकांपासून मिळणारा दगा फटका लक्षात घेऊन जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी नाविण्यपूर्व 'चिया'च्या पीक लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळेच चालूवर्षी तब्बल ३,६०८ हेक्टर क्षेत्रावर चियाची लागवड झाली होती. मात्र, अन्य पिकांप्रमाणेच चियाच्या दरालाही फटका बसणे सुरू झाले असून १४ दिवसांत क्विंटलमागे १३०० रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
देशात सर्वप्रथम कर्नाटकमध्ये चियाची लागवड सुरू झाली. त्यानंतर इतर राज्यांनीही त्याकडे वळून चिया लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ दोन वर्षात वाशिम जिल्ह्याने कर्नाटक राज्यापेक्षाही जास्त क्षेत्रावर चियाची लागवड केली आहे. चियाला सुरुवातीच्या काळात चांगला दर मिळाला. मात्र, आता दरात सततची घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान वाशिम जिल्ह्यात पुढील काळात चिया पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी शासनाने या पिकाला किमान १३ ते १४ हजार प्रतिक्विंटल दर देण्याची सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
गत महिन्यांत मिळाला होता १४ हजारापर्यंतचा दर !
• चिया या नाविण्यपूर्ण पिकाला वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २२ मार्च रोजी प्रतिक्विंटल १२,३५० ते १४,००० पर्यंत दर मिळाला होता. यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात आला.
• मात्र, अवघ्या चौदाच दिवसांत, ५ एप्रिल रोजी चियाच्या दरात मोठी घसरण होऊन दर प्रतिक्विंटल ११,०५० ते १२,६५० पर्यंत कमी झाले. ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी ठरली.
• २२ मार्चचा दर : १२,३५०-१४,०००
• ५ एप्रिलचा दर : ११०५०-१२,६५०