राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जवळपास चार वर्षानंतर हरभऱ्याच्या दरांनी गत आठवड्यात लक्षणीय उसळी घेतली होती. मात्र, नवीन हरभरा बाजारात येण्याआधीच दरात पुन्हा घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ५,५७५ रुपये या पातळीवर पोहोचलेले हरभऱ्याचे दर आता घसरून ५,४३० रुपये इतके झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण होते. मात्र, अचानक शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गात निराशा व्यक्त केली जात आहे. सध्या अकोला जिल्ह्यात हरभऱ्याला सरासरी ५,२०० रुपये, तर कमाल ५,४३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
हमीपेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता
• आवक तुलनेने कमी असल्याने तसेच साठवणूकदार व व्यापाऱ्यांकडून खरेदी वाढल्यामुळे अलीकडील काळात दरांना आधार मिळाला होता. मात्र, नवीन हरभरा बाजारात दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून खरेदीचा वेग काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
•केंद्र शासनाने २०२५-२०२६ या रब्बी हंगामासाठी हरभरा पिकाचा किमान आधारभूत दर (एमएसपी) प्रतिक्विंटल ५,६५० रुपये जाहीर केला आहे. सध्याचे बाजारभाव हमी दराच्या जवळ पोहोचल्याने येत्या काळात हरभऱ्याचे दर हमीदराच्या वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
• अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी १७४ क्विंटल हरभऱ्याची आवक नोंदविण्यात आली. यावेळी किमान ४,७८५ रुपये, सरासरी ५,२०० रुपये, तर कमाल ५,४३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
