भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन २०२५-२६ खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यासाठी केवळ २० लाख क्विंटलची लिमिट मिळाली होती. आता ती संपल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील धान खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी सात-बारा नोंदणी करून धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
धानखरेदीला लागलेल्या या लिमिटच्या ग्रहणामुळे शेतकऱ्यांसह केंद्र चालक त्रस्त झाले. भंडारा जिल्ह्यात खरीप २०२५ मध्ये जिल्हा पणन विभागाकडून डिसेंबर महिन्यात धान खरेदीची परवानगी देत धानखरेदी सुरू करण्यात आली. मात्र, धान खरेदी केंद्रांना लिमिट उशिरा आल्याने संपूर्ण शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान, पणन विभागाकडून कमी अधिक २ लाख क्विंटलची लिमिट देऊन धान खरेदी सुरू झाली. मात्र, ती अवघ्या २-३ दिवसांत संपल्याने केंद्र चालकांना परत वाढवण्यासाठी खटाटोप करावी लागला. खरीप हंगाम २०२५-२६ करीता आजपर्यंत जिल्ह्यासाठी एकूण २० लाख ४८ हजार क्विंटल धान खरेदीची लिमिट आली होती.
जिल्ह्यात २५० धानखरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्यामुळे मिळालेली लिमिट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पणन विभागाकडून प्राप्त झाली आहे. राज्यात वजन असलेले राजकीय नेते जिल्ह्यात आहेत. शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन धान खरेदीची लिमीट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षाच
शेतक-यांना हमीभाव मिळावा या उद्देशाने शासनाने आधारभूत धानखरेदी केंद्र सुरू केले. मात्र, शेतकऱ्यांच्या थानाची खरेदी होण्यापूर्वीच या खरेदी केंद्रांची लिमिट संपल्याने शेकडो शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यात सन २०२४-२५ च्या खरीप हंगामात सुमारे २८ लाख क्विंटलची खरेदी झाली होती. २० लाख क्विंटलची लिमीट संपल्याने पुढे कीती वाढवून मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
लिमिट वाढवून मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या १-२ दिवसांत वाढीव लक्ष्य येण्याची शक्यता आहे. - सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.
