बारामती : बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आले आहे.
रब्बी पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमीभावाने भरडधान्य (मका) खरेदी करिता वेब पोर्टलवर २ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. च्या वतीने य कळविलेले आहे.
तरी बारामती व पुणे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करून हमीभाव खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.
सदर दिलेल्या मुदतीनुसार दि. ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन निरा संघाचे चेअरमन सतीश काकडे यांनी केले आहे. केंद्र शासनाने मक्याचा हमीदर रुपये २,२२५ असा निश्चित केला आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीचा ७/१२ उतारा व त्यावर मक्याची नोंद असलेला सन २०२४-२५ पिकपेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएससी कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर इत्यादी संपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी बारामती बाजार समिती व निरा कॅनॉल संघ या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.