महागडी खते, कांदा रोपे आणि इतर शेतमशागतीच्या खर्चामुळे कांदा लागवडीवर मोठा खर्च झाला. मात्र, बाजारात कांद्याला अल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. यामुळे सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती माती लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्याच्या चाकण बाजारात कांद्याच्या भावात १० ते १५ रुपये किलोपर्यंत घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांनी लागवड करून मोठ्या आशेने कांद्याची विक्री करण्याची तयारी केली होती; परंतु बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे तसेच मागणी कमी झाल्यामुळे भाव घटले आहे.
ग्रामीण भागात खरं तर नगदी नफा मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते; परंतु भाव पडल्याने सध्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवाय कांदा टिकून ठेवायचा झाल्यास त्यासाठी गोदामाची आणि सुक्या ठिकाणाची आवश्यकता असते. परिणामी त्यासाठी येणारा खर्च वाढत जातो. त्यामुळे शेतकरी उदासीन होतात. शिवाय कांदा बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याचा खर्च करावा लागतो.
इंधन, मजुरी, मशागत खर्चात दुपटीने वाढ
कांदा रोपे, खते, कीटकनाशकांचा खर्च शेतकऱ्यांना जिवाच्या वर ठरत आहे, तर दुसरीकडे उत्पन्न मात्र समाधानकारक मिळत नसल्याचे चित्र आहे. इंधनाचा खर्च दुप्पट झाला आहे, तर मजुरीच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.
कांद्याला किमान २० ते ३० रुपये भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु भाव मिळत नाही. कांदा विक्रीतून लागवड ही वसूल होत नाही. - कैलास भोसले, शेतकरी, चाकण.
कांद्यावरील प्रस्तावित २० टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने मागे घेतल्याने एप्रिल महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे काहीअंशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. - विजयसिंह शिंदे, सभापती, चाकण.