सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी २९४ कांदा ट्रक आवक झाली. बुधवारी किमान २००, कमाल ३७००, तर सर्वसाधारण दर १७०० रुपये इतका मिळाला.
शुक्रवारी २९४ ट्रकमधून ५८ हजार ९०४ पिशव्यांतून २९ हजार ४५२ क्विंटल कांद्यातून ५ कोटी ६८ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली आहे.
बांगलादेश व श्रीलंका येथे कांद्याची निर्यात सुरू झाल्याचा परिणाम दरावर होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने लोकमतशी बोलताना सांगितले.
मागील चार ते पाच दिवसांपासून सोलापूरच्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. चांगला भाव मिळत असल्याने कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून कांदा येत आहे.
सोमवारी २२१, तर मंगळवारी २६१ कांदा ट्रक बाजारात विक्रीसाठी आला होता. सोमवार, मंगळवारपेक्षा २०० रुपये जास्त दराने बुधवारी कांदा विक्री झाला.
समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. कांद्याच्या गाड्या वाढल्याने बाजार समितीत वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
सकाळी लिलाव झाल्यानंतर दिवसभर गाड्यांतून माल उतरविला जातो. रात्रभर गाड्यांची ये-जा बाजार समितीमध्ये दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षातील उच्चांकी भाव
◼️ मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता.
◼️ यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी भाव म्हणून बुधवारच्या बाजारपेठेकडे पाहिले जाते.
◼️ बुधवारी ३७०० रूपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. सरासरी दरही ३००० असा होता.
◼️ दर वाढल्याने गुरूवारीही गाड्यांची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या भागातून येतोय कांदा विक्रीला
◼️ मार्केट यार्डात कांद्याचे दर वाढले तरी किरकोळ बाजारातील कांद्याचे दर स्थिरच दिसून येत आहेत.
◼️ पुणे, अहिल्यानगर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, धाराशिव, उमरगा, बीड या भागातूनही कांदा विक्रीसाठी सोलापुरात येत आहे.
◼️ चांगला दर मिळत असल्याने हैद्राबाद, लासलगांवला जाणाराही कांदा आता सोलापुरात विक्री होऊ लागला आहे.
सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत आहे. बि-बियाणं तयार करणाऱ्या कंपन्या व लोक कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. चांगल्या कांद्याला ३६०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. कमी व मध्यम प्रतीच्या कांद्याला ३०००, ३२०० रूपयांचा दर मिळत आहे. गाड्यांची आवक वाढली आहे, आणखीन आवक वाढेल असा अंदाज आहे. - नसीर अहमद खलिफा, कांदा व्यापारी
अधिक वाचा: पुणे जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने केले राज्यात सर्वाधिक उस गाळप; साखर उताऱ्यात कोण पुढे?
