हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या आठवड्यापासून हळदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. ऐन हंगामात सरासरी १२ ते १३ हजार रुपये क्विंटलने विक्री होणारी हळद सध्या १५ ते १५ हजार ५०० रुपयाने विक्री होत आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच हळद विक्री केली आहे.
त्यामुळे आता साठवणूकदारांची चांदी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मार्केट यार्डात हळदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यापासून हे दर टिकून असून, क्विंटलमागे एक ते दोन हजार रुपयांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली हळद साठवून ठेवली होती.
त्यांना ही दरवाढ दिलासादायक ठरली आहे. मात्र शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नसल्यामुळे मार्केट यार्डात आवक मंदावली आहे. हळदीचा मुख्य हंगाम सुरू असताना, बाजारभाव तुलनेने कमी होते. त्यावेळी बहुतांश अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे आपली हळद विक्री केली होती.
त्या काळात शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही, ज्यामुळे अनेकांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले होते. आता जेव्हा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि आवक घटू लागली आहे, तेव्हा दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ज्या मोठ्या शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी माल साठवून ठेवला होता, त्यांनाच या वाढीव दराचा खरा फायदा होताना दिसत आहे.
सरासरी १५,७०० रुपयांचा भाव
• संत नामदेव मार्केट यार्डात सध्या हळदीला सरासरी १५ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. २ जानेवारी रोजी किमान १४ हजार ४०० ते कमाल १७ हजार रुपये दर नोंदविल्या गेला.
• आता शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक नसल्यामुळे आवक मंदावण्याची शक्यता आहे. परिणामी, दरात आणखी वाढ होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीनचे दर स्थिर
• यंदा अतिवृष्टीच्या माऱ्यात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, उत्पादनात घट झाली असताना बाजारात भावही समाधानकारक मिळाला नाही.
• त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडखर्चही वसूल झाला नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भावात किंचीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, चारच दिवसांत पुन्हा घसरण झाली.
