सोलापूर : यंदा उन्हाळ्यातच उशिराने लिंबू बाजारात विक्रीसाठी आले. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात लिंबाचे दर गगनाला भिडले होते.
मे महिन्याच्या दरम्यान लिंबू बाजारात आले आणि पावसाला सुरुवात झाली. आता पावसाळा संपताना हिरव्या लिंबाची आवक वाढली आहे.
मागील वर्षी उन्हाळ्यात लिंबाचे दर प्रति किलो १८० ते २२० होते. दि.१५ मे नंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि याच दरम्यान लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली.
उन्हाळ्यात असलेले दर कोसळले आणि मिळेल त्या भावाने लिंबू बाजारपेठेत विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नव्हता. याच काळात लोणचे उद्योजकांनी १५ रुपये प्रति किलो दराने उत्तम प्रतीचा माल खरेदी केला.
पावसाळ्यात लिंबाचा बहार चांगला असला तरी बाजारात सध्या हिरव्या रंगाचा कच्चा लिंबू अधिक दिसून येतो. या लिंबाला १० ते १५ रु. प्रति किलो दर आहे तर पिवळ्या रंगाचा तयार लिंबू १८ ते २२ रु. दराने विकला जात आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दररोज २० टन लिंबाची आवक आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून हा माल येत आहे.
नवीन माल आल्याने भाव कोसळले असल्याचे सांगण्यात येते. पिवळा आणि निकृष्ट दर्जाचा लिंबू लोणच्यासाठी ८ ते १० रु. दराने खरेदी केला जात आहे.
पाऊस थांबल्यामुळे कच्च्या आणि हिव्या लिंबाची आवक वाढली आहे. आज माझ्याकडे ७ टन आवक होती. मागणी कमी असल्याने भाव शेतकऱ्यांना परवडत नाहीत तसेच खरेदीदारही पाठ फिरवतात. - अल्ताफ लिंबूवाले, रॉयल लेमन कंपनी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
अधिक वाचा: अखेर 'एफआरपी'चा निर्णय झाला; आता त्याच वर्षाचा साखर उतारा धरून शेतकऱ्यांना पेमेंट होणार