नाशिक : दिवाळी सणामुळे पुढील संपूर्ण आठवडाभर बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा व मका विक्रीसाठी एकच गर्दी केल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात बाजार आवारात दुपटीने वाढ दिसून आली.
कांद्याला किमान ५००, तर कमाल १३०० रुपये व सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला. मका किमान १५०० रुपये, कमाल २१०१ रुपये व सरासरी १८५० रुपये दराने व्यापारी बांधवांनी खरेदी केला.
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे नवीन लाल कांद्याच्या पिकाला फटका बसल्याने हा कांदा बाजारात विक्रीस येण्यास साधारणतः महिनाभर विलंब होणार आहे. शिवाय पुढील संपूर्ण आठवड्यात बाजार समितीचे कामकाज बंद राहणार असल्याने दिवाळीला दोन पैसे जवळ असावेत, यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात असलेला उन्हाळी कांदा व मका विक्रीसाठी एकच गर्दी केल्याने बाजार आवारात प्रचंड आवक झाली होती. उन्हाळी कांद्याचे ८७९, तर मक्याची विक्रमी ७२८ वाहने बाजारात माल विक्रीसाठी दाखल झाली होती.
परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे पीक बाधित झाले असतानाच दिवाळीनंतर उन्हाळी कांद्याची मागणी घटून बाजारभाव कमी होतील या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मका मालाला चांगला दर मिळत असल्याने मका विक्रीसाठीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून वाहनांच्या रांगला लागल्या आहेत. परिणामी दरात १०० ते १५० रुपयांची घसरण दिसून आली.
परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला नवीन लाल कांदा शेतातच बाधित झाल्याने नुकसान झाले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने लावून धरलेल्या उन्हाळी कांद्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावात मका व कांदा विकून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेला कांदा आणि मका बाजारात आणला असूप मोठ्या प्रमाणात आवक झाली. बाजारात आलेला कांदा, मका यांच्या व्यस्त प्रमाणामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम झाला.
- संभाजी देवरे, शेतकरी