अमरावती : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, खाद्यतेलाच्या दरातील सातत्याने होत असलेली वाढ आणि क्रूड ऑइल महागाईचा परिणाम यामुळे सध्या कापसाच्या दरात लक्षणीय तेजी दिसून येत आहे.(Cotton Market)
'पांढरे सोने' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाने यंदा उच्चांकी पातळी गाठली असून मंगळवारी अमरावतीतील खासगी बाजारात कापसाला तब्बल ९,००० ते ९,२५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.(Cotton Market)
दरवाढीमागील प्रमुख कारणे
कापूस दरातील वाढ ही केवळ स्थानिक कारणांमुळे नसून जागतिक बाजारातील बदलांचा त्यावर थेट परिणाम होत आहे.
खाद्यतेल दरवाढ आणि सरकीला मागणी वाढली
खाद्यतेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकीला मोठी मागणी निर्माण झाली आहे. सरकीच्या वाढत्या दराचा थेट परिणाम कापसाच्या भावावर झाला.
क्रूड ऑइल महाग आणि पॉलिस्टर उत्पादन महाग
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलचे दर वाढल्याने पॉलिस्टर उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी कापड उद्योगाने पुन्हा नैसर्गिक कापसाकडे वळण्यास सुरुवात केली.
जागतिक तणाव आणि पुरवठा साखळी विस्कळीत
आखाती देशांमधील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय कापसाला परदेशातूनही मागणी वाढली आहे.
उत्पादन घट आणि आवक कमी
गतवर्षीच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस व अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. यामुळे बाजारात सध्या कापसाची आवक मर्यादित आहे.
कापसाची साठवणूक जोखमीची असल्याने मोठे शेतकरीच साठा ठेवतात, त्यामुळे बाजारात उपलब्धता आणखी कमी झाली आहे.
गेल्या दीड महिन्यात सातत्याने तेजी
सुमारे दीड महिन्यांपूर्वी कापसाचे दर ७,००० रुपयांच्या आसपास होते. मात्र सततच्या मागणीमुळे आणि पुरवठा कमी झाल्याने दर झपाट्याने वाढत जाऊन आता ९,००० रुपयांच्या पुढे गेले आहेत.
जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे क्रूड ऑइल महागले आहे. याचा परिणाम पॉलिस्टर उद्योगावर होऊन कापसाची मागणी वाढली आहे.- पवन देशमुख, शेतमाल दर अभ्यासक
सध्याचे प्रमुख दर
कापूस: ९,००० – ९,२५० रु. प्रति क्विंटल
सरकी: ४,४०० रु. प्रति क्विंटल
रुई (खंडी ३५६ किलो): ६४,००० रु.
आंतरराष्ट्रीय दर: ८३.५० सेंट प्रति पाऊंड
एकीकडे उत्पादनात घट आणि दुसरीकडे जागतिक मागणी वाढ या दुहेरी प्रभावामुळे कापसाचे दर सध्या उच्चांकावर पोहोचले आहेत. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर न झाल्यास कापसाच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा सविस्तर : soybean cotton rate : सोयाबीन-कापसाला जबरदस्त उठाव; दर पुन्हा वधारले
