soybean cotton rate : राज्यातील शेतमाल बाजारात सध्या सोयाबीन आणि कापसाच्या दरात पुन्हा तेजीचे वातावरण दिसून येत आहे. (soybean cotton rate)
खाद्यतेल, डीओसी (डिऑइल्ड केक) आणि क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींसह बाजारातील आवक घटल्यामुळे या दोन्ही पिकांना चांगला उठाव मिळाला आहे.(soybean cotton rate)
कापसाला पुन्हा मागणी; दर ८,८०० रुपयांपर्यंत
हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन वाढीच्या अंदाजामुळे कापसाचे दर घसरले होते. मात्र प्रत्यक्षात उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी निघाल्याने बाजारातील उपलब्धता घटली आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइल महागल्याने पॉलिस्टर कापडाचे दर वाढले, त्याचा परिणाम कापसाच्या मागणीवर झाला. याशिवाय खाद्यतेल महागल्याने सरकीला मागणी वाढली आणि कापसाला आधार मिळाला.
सध्याचा दर : ८,२०० ते ८,८०० रुपये प्रति क्विंटल
पूर्वी हमीभाव (CCI) : ८,१०० रुपये
उत्पादन घट, वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील घडामोडी यामुळे कापसाच्या दरात वाढ झाली आहे.- पवन देशमुख, शेतमाल अभ्यासक
सोयाबीनलाही 'चमक'; दर ५,७५० रुपयांवर
सोयाबीनलाही सध्या बाजारात चांगली मागणी निर्माण झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले होते, तरीही सुरुवातीला दर स्थिर राहिले.
आता परिस्थिती बदलली असून
खाद्यतेलाच्या किमतीत वाढ
डीओसीला वाढती मागणी
बाजारातील आवक कमी
या कारणांमुळे सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे.
सध्याचा उच्चांक : ५,७५० – ५,७८० रुपये प्रति क्विंटल
पूर्वीचा दर : ४,५०० रुपये प्रति क्विंटल
कमी उत्पादनाचा परिणाम
गतवर्षी अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले.
परिणामी, यंदा बाजारात स्टॉक मर्यादित राहिला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता, मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी तो हमीभावाने विकला. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे माल कमी असून, वाढत्या दराचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच होत आहे.
कापसाचे दर (एप्रिल महिन्यातील बदल)
१५ एप्रिल : ८,१०० – ८,३०० रुपये
१७ एप्रिल : ८,१०० – ८,२७५ रुपये
२० एप्रिल : ८,२०० – ८,४०० रुपये
२२ एप्रिल : ८,२०० – ८,४७५ रुपये
२४ एप्रिल : ८,२०० – ८,७५० रुपये
खाद्यतेल, डीओसी आणि क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींसह आवक घटल्यामुळे सध्या शेतमाल बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत.
कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना चांगला उठाव मिळाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत आवक आणि जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chilli Export : तिखटाचा जागतिक ठसका; धर्माबादची मिरची झाली ग्लोबल स्टार
अधिक वाचा : Wheat Market Update: मुंबई-पुणे मध्ये जोरदार दर, पण 'या' बाजारात गहू स्वस्त!
