Bank Cash Problem : वाशिम जिल्ह्यातील बँकांमधून रोख रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांवर होत आहे.(Bank Cash Problem)
रोख टंचाई इतकी तीव्र झाली की २४ एप्रिल रोजी बाजार समितीला व्यवहार बंद ठेवावे लागले. २५ एप्रिलपासून व्यवहार पुन्हा सुरू झाले असले तरी, रोख अभावी शेतकरी, व्यापारी आणि आडते सर्वच स्तरांवर अडचणीत सापडले आहेत.(Bank Cash Problem)
खात्यात पैसे… पण हातात नाही!
शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात RTGS किंवा धनादेशाद्वारे पैसे जमा होत आहेत. मात्र, बँकेत जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता 'रोख उपलब्ध नाही' असे उत्तर मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.
'खात्यात पैसे असूनही काढता येत नाहीत, मग व्यवहार कसे करायचे?' असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
बाजारातील व्यवहार विस्कळीत
वाशिम बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होत असून कोट्यवधींची उलाढाल होते.
सामान्यतः व्यवहार रोखीनेच केले जातात. मात्र, रोख टंचाईमुळे व्यापारी आणि आडत्यांकडेही पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने संपूर्ण व्यवहार साखळी विस्कळीत झाली आहे.
८ ते १० दिवसांची प्रतीक्षा
सध्या बँकांमधून पैसे काढण्यासाठी ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे.
व्यापारी आणि आडत्यांचीही कोंडी
रोख अभावी व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदी करता येत नाही, तर आडत्यांनाही बँकांकडून अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने व्यवहार थांबण्याच्या स्थितीत आले आहेत. परिणामी, बाजारातील उलाढाल घटण्याची शक्यता आहे.
धान्य विक्रीनंतर पैसे खात्यात जमा होत आहेत. मात्र, बँकांतून रोख मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. आरबीआयकडून रोख पुरवठ्यावर काही निर्बंध असल्याचे बँकांकडून सांगितले जात आहे.- वामनराव सोळंके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती
बँकांनी दैनंदिन व्यवहारांसाठी पुरेशी रोख ठेवणे आवश्यक आहे. या प्रकरणी सर्व बँक प्रतिनिधींना सूचना दिल्या जातील.- यशवीर कुमार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
तातडीने तोडगा आवश्यक
रोख टंचाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शेतकरी, व्यापारी आणि आडते यांच्यातून बँकांनी तातडीने रोख उपलब्ध करून देत परिस्थिती सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाशिममध्ये 'खात्यात पैसे, पण हातात नाही' अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून, यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास कृषी बाजार व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर : mango market : गावरान आंबा इतका दुर्मिळ का झाला? कारण ऐकून थक्क व्हाल
