अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत केरोसीन वाटपाला हिरवा कंदील दिला आहे.(Kerosene Distribution Scheme)
जिल्ह्यासाठी १०७ किलोलीटर (केएल) केरोसीन साठा मंजूर करण्यात आला असून, रविवारीपासून त्याचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना केरोसीन प्रतिलिटर ६५ रुपये दराने उपलब्ध होणार आहे.(Kerosene Distribution Scheme)
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना प्राधान्याने केरोसीन वितरित करण्यात येणार आहे.
दुर्गम भागातील कुटुंबांना प्रत्येकी ३ लिटर केरोसीन देण्याचा प्रस्ताव असून, याबाबत अंतिम निर्णय तहसीलदार स्तरावर घेतला जाणार आहे.
तालुकानिहाय वाटप
जिल्ह्यातील १२ तालुक्यांना प्रत्येकी सुमारे ७ हजार लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. तर दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा आणि धारणी तालुक्यांना प्रत्येकी १२ हजार लिटर साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मेळघाट परिसरात सुमारे २४ हजार लिटर केरोसीन वितरित होणार आहे.
गॅस टंचाईमुळे वाढली गरज
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. शहरी भागात सुमारे २५ दिवस तर ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांपासून गॅस बुकिंग होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत केरोसीन हा पर्याय म्हणून पुढे आला आहे.
दुकानदारांची नाराजी
स्वस्त धान्य दुकानांमार्फत केरोसीन वितरण केले जाणार असले तरी दुकानदारांना प्रति लिटर फक्त अडीच रुपये कमिशन मिळणार आहे. हा दर कमी असल्याने दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
अपुरा कोटा ठरणार?
जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला १०७ केएल साठा अपुरा ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सर्वांपर्यंत पुरेसा पुरवठा होणे आव्हानात्मक ठरणार आहे.
प्रशासन काय सांगते?
गॅस टंचाईच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी केरोसीन वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत साठा प्राप्त होईल. दुर्गम गावांची निवड करून टप्प्याटप्प्याने वितरण केले जाईल.- प्रज्वल पाथरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी
गॅस टंचाईच्या संकटात केरोसीन वाटपाचा हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा असला, तरी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.
