नाशिक : मागील रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामात मका, कापूस व कांद्याची लागवड करण्यात आली. मात्र, यंदाही निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे नगदी पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, कोसळलेल्या बाजारभावामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
मक्यासह कापूस, कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी, यंदा मका, कापूस आणि कांद्याचे उत्पन्न सुमारे ७० टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मक्याचे दर मागील वर्षी १८०० ते २२०० रुपये क्विंटल होते. यंदा मात्र हे दर १३५० ते १५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.
कांद्याच्या भावात अपेक्षित सुधारणा नाही
कांद्याच्या बाबतीत परिस्थिती गंभीर आहे. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याला ३० ते ४५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता. यावर्षी मात्र मे २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत कांदा केवळ १० ते १५ रुपये किलो दराने विकावा लागला. यासाठी शेतकऱ्यांना १० रुपये किलो खर्च येतो. त्यामुळे नफा तर दूरच, मूळ खर्चही परत मिळत नाही. साठवलेला रांगडा कांदा सध्या ८०० ते १३०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे.
सध्या साठवलेला आणि नव्याने आलेला कांदा दोन्ही बाजारात आले आहेत. त्यामुळे दरावर ताण आहे. वाहतूक, गोणी, मजुरी यांचा खर्च कधी कधी कांद्याच्या दरापेक्षाही जास्त होतो. अशा वेळी कांदा रोटा मारून द्यावा लागतो.
- भिकन महाजन, कांदा व्यापारी, लासूर.
कांद्याच्या लागवडीला प्रति किलो दहा रुपये खर्च येतो. त्यात वीज, वन्य प्राणी, हवामान, मजुरी, साठवणूक, वाहतूक या सगळ्या अडचणींवर मात करून कांदा पिकवतो. पण, बाजारात ८ ते १२ रुपये किलो एवढाच दर मिळतो. मग इतके दिवस मेहनत करूनही कसं जगायचं?
- सुधीर पाटील, कांदा उत्पादक