Join us

Lasun Bajar Bhav : लसूण बाजार आणखी दोन महिने तेजीत राहण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:28 IST

देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसणाने दर ४०० रुपये पार केले आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येत आहे.

पुणे : देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला सध्या उच्चांकी दर मिळत आहेत. लसणाने दर ४०० रुपये पार केले आहेत. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येत आहे.

अफगाणिस्तानातील लसूण मुंबई, दिल्ली, तसेच दक्षिण भारतातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जात आहे. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर नियंत्रित झाले आहेत.

अन्यथा, किरकोळ बाजारातील लसणाच्या दरात मोठी वाढ होऊन प्रतिकिलोचे दर ५०० रुपयांच्या पुढे गेले असते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे.

मागणीच्या तुलनेत आवक कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाचे दर ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

नवीन आवक सुरू होईपर्यंत पुढील दोन महिने दर तेजीत राहणार आहेत. अफगाणिस्तानातील लसूण आयात केल्याने दर नियंत्रित झाले आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील लसूण व्यापारी समीर रायकर यांनी दिली.

येथून होते आवकलसणाची सर्वाधिक लागवड गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबात होत असते. त्यामुळे या राज्यांतून लसणाची महाराष्ट्रात आवक होत असते.

लसणाचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. गेल्यावर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडे लसणाचा फारसा साठा नव्हता. त्यामुळे यंदा लसणाचे तेजीतील दर टिकून होते. लसणाचा हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी आहे. मागणीच्या तुलनेत आवकही कमी प्रमाणावर होत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. मार्केटयार्ड बाजारात परराज्यातून लसणाच्या पाच ते सात गाड्यांची आवक होत आहे. - समीर रायकर, व्यापारी

अधिक वाचा: Lasun Lagwad : लसूण लागवड करताय? ह्या आहेत लसणाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सात जाती

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपुणेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीअफगाणिस्तानभाज्यागुजरातराजस्थानमध्य प्रदेशपंजाबशेतकरी