पुणे : दरवर्षी राज्यातून रत्नागिरी भागातून पहिली आवक होते. मात्र, यंदा प्रथमच मार्केट यार्ड येथे कर्नाटक येथील टुंकूर भागातून ही पहिली आवक झाली असून कर्नाटकने बाजी मारली आहे.
मार्केटयार्ड फळबाजार येथील रोहन उरसळ यांच्या गाळ्यावर कर्नाटक येथील शेतकरी जी.एम. शफीउल्ला यांच्या शेतातून ६ पेट्यांची आवक झाली असून ४ डझनाच्या पेटीला लिलावात ५ हजार १०० रुपये भाव मिळाला.
ती सुरेश केवलाणी आणि बोनी रोहरा यांनी खरेदी केली. यावेळी सतीश उरसळ, आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी कर्नाटक येथून लालबाग आंब्याची आवक झाली होती. त्यानंतर आता हापूसचीही आवक सुरू झाली आहे.
हवामान बदलामुळे मागील वर्षी कर्नाटक येथील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आवक कमी झाली होती. मात्र, यंदा अधिक आवक होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
फेब्रुवारीमध्ये तुरळक आवक होईल. दरवर्षी एप्रिलमध्ये हंगाम सुरू होतो. मात्र, तो यंदा मार्चमध्येच सुरू होण्याचा अंदाज आहे.
पोषक हवामानामुळे उत्पादन झाल्यामुळे यंदा लवकरच कर्नाटक हापूसची आवक झाली आहे. यंदा नेहमीच्या तुलनेत जास्त आवक होण्याचा अंदाज आहे. - रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे व्यापारी
अधिक वाचा: राज्यात 'या' साखर कारखान्याने केले सर्वाधिक उस गाळप; साखर उताऱ्यात कोण पुढे?
