चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात मोठी तेजी दिसून आली आहे.
कांद्याची आवक दुपटीने वाढूनही भावात २०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, वाटाणा, फ्लॉवर, वांगी, भेंडी, काकडी, चवळी आणि शेवग्याची प्रचंड आवक झाली.
मात्र, मेथी, कोथिंबीर आणि शेपू यांच्या आवकेत घट झाल्याने त्यांच्या भावात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. बाजारातील एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपये इतकी झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल नोंदवली गेली. कांद्याचा कमाल भाव १,३०० रुपयांवरून १,५०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. कांद्याचे भाव क्रमांक १) १,५०० रुपये, क्रमांक २) १,१०० रुपये आणि क्रमांक ३) ८०० रुपये असे नोंदवले गेले.
दुसरीकडे बटाट्याची आवक २,२५० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत २५० क्विंटलने अधिक आहे. यामुळे बटाट्याच्या कमाल भावात २०० रुपयांची घट होऊन तो २,००० रुपयांवरून १,८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला.
पालेभाज्यांचे भाव वधारले
◼️ पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर आणि शेपू यांच्या आवकेत घट झाल्याने भावात वाढ झाली.
◼️ मेथीची आवक ६,४७० जुड्या असून, तिला २,००० ते ३,००० रुपये प्रति १०० जुड्या भाव मिळाला.
◼️ कोथिंबिरीची आवक २३,९५० जुड्या नोंदवली गेली, आणि तिला १,२०० ते २,००० रुपये भाव मिळाला.
◼️ शेपूची आवक ३,०५० जुड्या इतकी कमी झाली असून, तिला ८०० ते १,२०० रुपये भाव मिळाला.
◼️ पालकाची आवक २,१४० जुड्या असून, तिला १,००० ते १,६०० रुपये भाव मिळाला.
अधिक वाचा: पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार