मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात लाल कांद्याच्या दरात दररोज प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपयांची घसरण होत असतानाच नाशिक जिल्ह्याच्या उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या आवकेतही घट होत असल्याचे चित्र आहे.
मागील आठवड्यात देशांतर्गत बाजारपेठेत लाल कांद्याची आवक घटल्याने मागणीत वाढ होऊन कांद्याचे दर प्रतिक्विंटल २८०० रुपयांपर्यंत तेजीत आले होते. मात्र चालू आठवड्यात देशांतर्गत बाजारपेठेत मागणी घटल्याने कांद्याच्या दरात दररोज शंभर शंभर रुपयांची घसरण होत असतानाच बाजार आवारात होत असलेल्या कांद्याच्या आवकेतही घट होत असल्याचे दिसून आले.
बाजार आवारात बुधवार (दि.२९) रोजी ६३० ट्रॅक्टर व ३८० पिकअप वाहनांमधून सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव किमान ७०१ रुपये, कमाल २६०० रुपये तर सरासरी १८०० रुपये दराने कांदा विक्री झाला.
सद्यःस्थितीत देशांतर्गत बाजारपेठेत मागणी घटल्याने कांद्याच्या दरात काही अंशी घसरण झाल्याचे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले. तर शेतात काढणीला असलेला लाल व पोळ कांदा अंतिम टप्प्यात असल्याने बाजारात कांदा आवकेत हळूहळू घट येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी सर्वोच्च दर २५२१ रु.
गेल्या तीन दिवसांत कांद्याच्या दरात होत असलेली घसरण व आवकेत झालेली घट पुढीलप्रमाणे : सोमवार (दि.२७) सर्वोच्च दर २७४१ रुपये, १४२१ वाहनांमधून १८ हजार ३५० क्विंटल आवक, मंगळवार (दि.२८) सर्वोच्च दर २६०१ रुपये, ११८९ वाहनांमधून १६ हजार ४०० क्विंटल आवक, बुधवार (दि.२९) सर्वोच्च दर २५२१ रुपये, १०१० वाहनांमधून १५ हजार क्विंटल आवक.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी