चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, याचा परिणाम बाजारभावांवर दिसून येत आहे.
कांद्याच्या भावात वाढ झाली असली तरी बटाटा आणि पालेभाज्यांचे भाव घसरले आहेत. लसूण आणि हिरव्या मिरचीची आवक वाढली असली तरी त्यांचे भात स्थिर राहिले.
बाजारातील एकूण उलाढाल ३ कोटी १० लाख रुपये झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ५०० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत १,००० क्विंटलने कमी आहे.
यामुळे कांद्याच्या कमाल भावात १०० रुपयांची वाढ होऊन तो १,६०० वरून १,७०० रुपये प्रति क्विंटल झाला. कांद्याचे इतर भाव १,४०० रुपये (भाव क्रमांक २) आणि १,००० रुपये (भाव क्रमांक ३) असे नोंदवले गेले.
बटाट्याची आवक १,१०० क्विंटल झाली मात्र, बटाट्याच्या कमाल भावात १०० रुपयांची घसरण होऊन तो २,००० वरून १,९०० रुपये प्रति क्विंटल झाला. इतर भाव १,५०० रुपये (भाव क्रमांक २) आणि १,२०० रुपये (भाव क्रमांक ३) असे आहेत.
पालेभाज्यांची आवक कमी झाली असली तरी भावात घसरण दिसून आली. संचालक महेंद्र गोरे यांच्या उपस्थितीत हिरव्या मिरचीचा लिलाव पार पडला.
लसूण आणि हिरवी मिरची स्थिर
- लसणाची आवक ५० क्विंटल झाली असून, कमाल भाव १०,००० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला.
- हिरव्या मिरचीची आवक ३७५ क्विंटल झाली आणि तिला ६,००० ते ७,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही