सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमीच आहे. मागील पंधरा दिवसांपासून दरामध्येही सातत्याने घसरण होत होती.
मात्र, सोमवारी दरामध्ये पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ३५०० रुपये क्विंटल विकला जाणारा कांदा बुधवारी ४१०० रुपयाला विकला गेला.
सोलापूर बाजार समितीत दरवर्षी जानेवारी महिन्यात जवळपास ६०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक होते. मागील वर्षी यावेळेस जवळपास ९०० ट्रक कांद्याची आवक होती.
यंदा परतीच्या पावसामुळे कांदा पाण्यात भिजून गेला. त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. परिणामी, तीनशे ते चारशे ट्रक माल सध्या यार्डात येत आहे.
दिवाळीपूर्वी कांद्याला पाच हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल, असे वाटत होते. मात्र, मागील १५ ते २० दिवसांपासून दरामध्ये सतत घसरण होत आहे.
आवक कमी असूनही दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात निच्चांकी आवक झाली होती. त्यामुळे कांदा मार्केटमध्ये गर्दी कमी पाहायला मिळाली.
सोमवारी ३२४ ट्रक कांद्याची आवक झाली. त्यामुळे कांदा मार्केटमध्ये थोडीफार गर्दी झाली होती. चांगल्या मालाला ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून, सरासरी दरही दीड हजारांवरून दोन हजारांपर्यंत वाढला आहे.
आणखी पाचशे रुपये दर वाढण्याची शक्यता
तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात कांद्याची आवक आता कमी झाली आहे. त्यामुळे दरात वाढ होत आहे. पुढील काही दिवसात आणखी पाचशे ते सहाशे रुपये दर वाढण्याचा अंदाज आहे.
इतर बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापुरात चांगला दर मिळत आहे. सरासरी दर आता दोन हजारांपर्यंत गेला आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला चार हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहे. मागील २० दिवसांनंतर आता दरात वाढ होत आहे. त्यामुळे चांगला माल विक्रीसाठी आणावा. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख