सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. हीच पावती अनुदानासाठी वैध धरली जाणार आहे.
तसेच जो व्यापारी विनापरवाना काजू बी खरेदी करणार त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आवाहन करण्यात येते की या आर्थिक २०२५-२०२६ च्या वर्षी काजू हंगाम चालू झाला आहे.
यंदा काजू बीला चांगला दर मिळण्याच्या दृष्टिकोनातून बाजार समिती ही प्रयत्नशील असून सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावरून काजू विक्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी, अडते, प्रक्रियादार यांना काजू बी विक्री करताना त्यांच्याजवळ बाजार समितीचे व्यापारी व प्रक्रियादार असल्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना व शासनाचे अधिकचे नियमानुसार जो व्यापारी आपल्याकडून खरेदी करणार आहे.
त्याच्याकडून रितसर पावती घेऊन काजू विक्री करणे आवश्यक आहे. कारण हंगामात शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीचे अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करणे गरजेचे आहे. शासन नियमानुसार अनुदानासाठी अनधिकृत व्यापाऱ्यांसोबत व्यवहार वैध धरले जाणार नाहीत.
तसेच व्यापारी वर्गालादेखील बाजार समितीतर्फे आवाहन करण्यात येते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी खरेदी-विक्री विकास व विनियमन अधिनियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना घेऊन काजू बी खरेदी करावयाची आहे.
जिल्ह्याच्या स्थानिक क्षेत्रांना सूट
खैर लाकडाची तोड व वाहतुकीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नानुसार वनमंत्री यांच्या कार्यालयामार्फत बांबूप्रमाणे खैर हा उक्त आणि नियमाच्या सर्व तरतुदीमधून रत्नागिरी व सिंधुदुर्ग (दोडामार्ग तालुका वगळून) जिह्यांच्या स्थानिक क्षेत्रांना सूट दिली आहे. तरी सर्व खैर व्यापारी व प्रक्रियादार यांनीसुद्धा बाजार समितीचा खरेदी व विक्रीसाठी परवाना घेण्याचे आवाहन तुळशीदास रावराणे यांनी केले आहे.