आठ दिवसांपूर्वी सरकीला उठाव येताच कापसाचा दर ८५०० रुपये क्विंटलपर्यंत वधारला होता. मात्र, देशांतर्गत घडामोडी व सीसीआयद्वारा खुल्या बाजारात गाठी विक्रीसाठी काढण्यात आल्याने पुन्हा दराला फटका बसला आहे. सध्या कापसाचा भाव पुन्हा ८ हजारांवर म्हणजेच जवळपास हमीदरावर स्थिरावल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून कापसाच्या आयातीवर पूर्ववत ११ टक्के आयात कर लागू केला. त्यामुळे परदेशातील कापूस महागला व देशांतर्गत बाजारात भारतीय कापसाला मागणी वाढली. परिणामी, दरामध्ये ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत वाढ झाली होती.
त्याचदरम्यान सरकीला उठाव आल्याने पांढऱ्या सोन्याला चमक मिळाली. मात्र, आता सीसीआयने त्यांच्या ८० लाख गाठींची खुल्या बाजारात विक्री सुरू केल्याने पुन्हा कापसाच्या दरात घसरण झाल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले. दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक करण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसत नाही.
कापसाची स्थिती
स्थानिक मार्केटमध्ये भाव : ७६०० ते ७८०० रुपये क्विंटल
देशांतर्गत सरकीचा भाव : ४१५०० रुपये क्विंटल
रुईचा आंतरराष्ट्रीय दर : ६३ सेंट पर पाउंड
खंडीचे दर (३५६ क्विं.) : ५४ हजार रुपये खंडी
या कारणांनी दरात घसरण
'सीसीआय'ने चालू हंगामातील ८० लाखांवर गाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी काढल्या आहेत. याचदरम्यान देशांतर्गत सरकीचा उठाव कमी झाल्याने दरात १०० ते १५० रुपयांनी कमी आलेली आहे. सोबतच खुल्या बाजारात स्थानिक कापसाची आवक वाढली. त्यामुळे कापसाच्या दरात ४०० ते ५०० रुपयांपर्यंत घट झाली आहे.
सरकीचा उठाव कमी झाला. सोबतच सीसीआयने ८० लाखांवर गाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी काढल्याने कापसाच्या दरात घसरण झालेली आहे. सध्या भाव हमीभावावर स्थिरावला आहे. - पवन देशमुख, शेतमाल दराचे अभ्यासक.
साठवणुकीकडे स्टॉकिस्टचा कल नाही!
आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांनी गरजेपुरता कापूस विक्रीस काढला होता. त्यानंतर जानेवारीमध्ये दरवाढ झाल्यानंतर खुल्या बाजारात पुन्हा कापसाची आवक वाढली. काही शेतकऱ्यांनी सीसीआयकडेही कापसाची विक्री केली आहे. सध्या बाजारात स्टॉकिस्टची भूमिका 'हॅन्ड टू माऊथ' अशी असल्याचे दिसून येत आहे. याचाही परिणाम होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
