निरभ्र वातावरण व गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे लाल कांद्याच्या उत्पादनात काही अंशी वाढ झाली असून, त्यांची प्रतवारीही सुधारल्याने चालू हंगामातील नवीन लाल कांद्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे.
त्यामुळे त्यांचे दर पाच हजारांपर्यंत पोहोचले असून, खारी फाटा येथील रामेश्वर कृषी या खासगी मार्केटमध्ये लाल कांद्यांना सर्वोच्च असा ४ हजार ८०० रुपये, तर उमराणे (जि. नाशिक) येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार ५५१ रुपये दर मिळाला आहे.
चालू वर्षी सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लाल कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले होते. त्यामुळे दुबार रोपे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. परिणामी लागवड उशिरा झाल्याने तसेच ऐन काढणीच्या वेळस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने दसरा-दिवाळीला बाजारात येणारा लाल कांदा तब्बल दीड महिना उशिराने आला.
शिवाय सुरुवातीच्या काळात पावसामुळे हा कांदा बाधित असल्याने या कांद्यांना बाजारात कवडीमोल असा पाचशे ते सातशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून निरभ्र वातावरण व लाल कांद्यासाठी पोषक असलेली थंडी वाढल्याने प्रतवारीत सुधारणा होऊन कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
त्यामुळे आपसूकच गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना मागणीदेखील वाढली आहे. परिणामी खरेदीदारांची माल खरेदीसाठी चढाओढ निर्माण झाल्याने खारी फाटा येथील रामेश्वर कृषी या खासगी मार्केटमध्ये बुधवारी (दि. ३) लाल कांद्यांना चालू हंगामातील सर्वोच्च असा ४ हजार ८०० रुपये, तर येथील उमराणे बाजार समितीत ४ हजार ५५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
लाल कांद्याची आवक
उमराणे बाजार समितीत २३८ ट्रॅक्टर व २१९ पिकअप वाहनांमधून सुमारे सात हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून, त्यांचे दर किमान ६०० रुपये, कमाल ४ हजार ५५१ रुपये, तर सरासरी २,२७५ रुपयांपर्यंत होते. त्याचप्रमाणे रामेश्वर मार्केटमध्ये ३५० ट्रॅक्टर, २८० पिकअप, आदी वाहनांमधून सुमारे ९ हजार क्विंटल आवक होऊन त्यांचे दर किमान ५०० रुपये, कमाल ४ हजार ८०० रुपये, तर सरासरी २,४०० रुपयांपर्यंत होते. दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे.
उच्च प्रतीच्या कांद्याला भाव
अंतिम टप्प्यात विक्रीस असलेल्या उन्हाळी कांद्यांना चाळींमध्ये साठवून सात महिने उलटले असून, सद्य:स्थितीत वाढलेल्या थंडीमुळे त्यांना कोंबही फुटू लागले आहेत. त्यामुळे हा कांदा बेचव होऊन प्रतवारीही घसरल्याने त्यांना मागणी घटली आहे. परिणामी बाजारात नवीन लाल कांद्यांना मागणी वाढल्याने उच्च प्रतीच्या कांद्याचे दर तेजीत आल्याचे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरात मोठी तफावत
• एकीकडे उच्च प्रतीच्या कांद्यांना तीन ते साडेचार हजार रुपयांचा दर मिळत असतानाच सर्वसामान्य कांद्यांना मात्र पाचशे ते हजार रुपये भाव मिळत असल्याने कांदा दरातील या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.
• उमराणे व खारी फाटा येथील रामेश्वर मार्केटमध्ये उच्च प्रतीच्या लाल कांद्यांना चांगला दर मिळत असल्याने नंदुरबार, धुळे, जळगाव, शिरपूर तसेच मध्य प्रदेशातील काही ठिकाणांहून लाल कांद्याची आवक होत असल्याचे चित्र आहे.
