हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या ज्वारी-शाळूच्या ताज्या हुरड्याला मोठी मागणी वाढली आहे.
पारंपरिक चव, पौष्टिकता आणि हुरडा पाटांचा ट्रेंड यामुळे यंदा हुरड्याचे दर झपाट्याने वाढले. काही आठवड्यांतच हुरड्याचा भाव ४०० रुपयांवर पोहोचला आहे.
थंडी वाढताच हुरडा खाण्याचा हंगाम सुरू होतो. भाजी मंडई, रस्त्यावरील फड, हाट-बाजारात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची मोठी गर्दी दिसते.
हुरडा पार्ट्यांनाही आला बहर
◼️ शहरालगतच्या शेतांमध्ये, फार्महाऊसमध्ये आणि पर्यटन स्थळांवर हुरडा पार्ट्यांची धामधूम सुरू आहे.
◼️ वीकेंडला बुकिंग फुल असून काही ठिकाणी प्रवेश शुल्कही वाढवण्यात आले आहे.
◼️ कुटुंबांसह तरुणाईही मोठ्या प्रमाणावर हुरडा खरेदी करत आहे.
◼️ हुरड्यासोबतच बोर, आवळे, कुरडू, कारली, शेंगदाणे, लाह्या यांसारख्या पदार्थाची मागणीही वाढली आहे.
◼️ हुरडा पार्ट्यांमुळे या वस्तूंचा दरही चढलेला आहे.
स्थानिक वाण व अंदाजे भाव (रु./किलो)
वाण - भाव (रु./किलो)
सुरती - प्रीमियम : ३८०-४००
सुरती - मध्यम : ३५०-३७०
पांढरी ज्वारी : ४००-४५०
फुलज्वारी : ३५०-३८०
शेलगी/मिश्रित : ३००-३३०
हुरड्यासाठी विशिष्ट वाणाचा वापर
हुरड्यासाठी साधी ज्वारी वापरली जात नाही. सुरती, फुलज्वारी, शेलगी, पांढरी ज्वारी यांसारखे वाणच तोंडात विरघळणारा, मऊ हुरडा देतात. उत्पादन कमी असल्याने त्यांचा दर जास्त असतो.
हुरड्याला भाव का?
विशिष्ट ज्वारी वाणांचे कमी उत्पादन, मजूर व वाहतूक खर्च वाढ, ताज्या हुरड्याची प्रक्रिया मेहनतीची, मागणी जास्त आवक कमी आहे.
कुठून येतो हुरडा?
स्थानिक बाजारात येणारा हुरडा मुख्यत्वे मावळ, मुळशी, जुन्नर, आळेफाटा, शिरूर, पारनेर, बारामती, सोलापूर आदी भागातून येतो. सकाळी कणसे छाटून दुपारीच शहरात पोहोचवली जातात.
पिकाला फटका
यंदा पावसाची अनियमितता, थंडीची तीव्रता आणि काही भागातील गारपीट यामुळे सुरती ज्वारी पिकाचे उत्पादन घटले. परिणामी आवक कमी आणि दर वधारले आहेत, तरी मागणी कायम आहे.
अधिक वाचा: थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायची तर मग खा 'ही' सर्वगुणसंपन्न पालेभाजी
