खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणीची कामे सध्या जोमात सुरू आहे. दिवाळीत या धानाची विक्री करून शेतकरी दिवाळी सण साजरा करतात व उधार उसनवारी फेडतात.
मात्र, यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू झाली नसून शासनानेसुद्धा धान खरेदीपूर्वी नोंदणी करण्याचे आदेश काढले नाही.
त्यामुळे हलका धान बाजारपेठेत, पण शासकीय धान खरेदी केंद्राचा ठावठिकाणा नसल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते.
तसेच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धानाची विक्री करावी लागू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते.
यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यास मदत होते. गोंदिया जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली आहे. यात हलक्या धानाचे क्षेत्र अधिक आहे. हलके धान हे दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची लवकरात लवकर विक्री करून दिवाळी सण साजरा करतात.
मात्र, यंदा हलका धान बाजारपेठेत आला तरी शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे, तर शेतकऱ्यांच्या नजरा शासकीय धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होते याकडे लागल्या आहेत.
नोंदणीचे आदेशच नाही!
• शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे, पण शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आदेश अद्यापही निघालेले नाही.
• नोंदणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत धान खरेदीला सुरुवात केली जाते. मात्र, अद्यापही नोंदणीचे आदेश निघाले नसल्याने धान खरेदीला केव्हा सुरुवात होणार याबाबत अनिश्चितता आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी
शासकीय धान खरेदीला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने शेतकरी गरजेपोटी पाचशे ते सहाशे कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा : एमपीएससी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट; दोन एकर अद्रक शेतीतून कमावले १५ लाख