सोलापूर : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती.
एका महिन्यात जवळपास पाच हजार ट्रक कांद्याचे आवक झाली. त्यातून ९५ कोटी ते १०० कोटी रुपयापर्यंत उलाढाल झाली आहे.
मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा डिसेंबर व जानेवारी महिन्यात म्हणावी तशी कांद्याची आवक झाली नाही. जानेवारी महिन्यात सरासरी ५०० ते ८०० ट्रक आवक अपेक्षित असताना केवळ ३०० ते ४०० ट्रक कांद्याची आवक होत होती.
आवक कमी झाल्यामुळे दर वाढण्याची आशा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली. उन्हाळी कांद्याची आवक फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरू झाली आहे.
कारण बहुतांश शेतकरी दिवाळीनंतर कांद्याची लागवड केली होती. फेब्रुवारी महिन्यात सरासरी दररोज २५० ते ३५० ट्रक कांद्याची आवक झाली. या महिन्यात सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला आहे.
एप्रिलनंतर पुणे जिल्ह्यातील माल येणारएप्रिल महिन्यानंतर पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातून भिगवण, केडगाव, कर्जत, जामखेड या भागातून कांदा सोलापूर मार्केटमध्ये येतो. त्या भागातील उन्हाळी कांदा दिवाळीपर्यंत टिकतो. त्यामुळे शेतकरी कांदा चाळीमध्ये ठेवून दर वाढल्यानंतर विक्रीला काढतात. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो.
सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची लागवड यंदा वाढली आहे. त्यामुळे आवक आता सरासरी अडीशे ते तीनशे ट्रक राहणार आहे. जूनपर्यंत आवक कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय दरही स्थिरच राहील, असा अंदाज आहे. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख
अधिक वाचा: Satbara Durusti : सातबाऱ्यात चूक असेल तर दुरुस्त कशी करायची? वाचा सविस्तर