योगेश बिडवईमुंबई : मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत अखंडपणे सुरू राहिलेला पाऊस, अतिवृष्टी यामुळे यंदा कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, हंगामाचे गणित पुरते बिघडले आहे.
त्यातून सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येणारा लाल कांदा अजून बाजारात आलेला नाही.
सध्या उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यावर्षी महामुंबईतकांदा आणखी स्वस्त होणार, की महागणार याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.
किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर ३० ते ४० रुपये किलो आहेत. त्यातही साठवणुकीत थोडा खराब कांदा ३० रुपये दराने मिळत आहे.
खरिपात अतिवृष्टीमुळे रोपे वाया गेली. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड केली. त्यालाही पावसाचा फटका बसल्याने कांद्याची अपेक्षित वाढ झाली नाही.
त्यामुळे सप्टेंबरअखेरीस येणारा लाल कांदा बाजारात आलाच नाही. लेट खरीप कांद्याचे पीक आता डिसेंबरमध्ये येईल.
उन्हाळ कांद्याची चांगली आवक◼️ सुदैवाने लासलगाव, पिंपळगावसह राज्यातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची चांगली आवक सुरू आहे.◼️ पुरवठा सुरळीत असल्याने भाव वाढलेले नाहीत.◼️ लासलगाव बाजार समितीत सरासरी १५ रुपये किलोने कांद्याची खरेदी सुरू आहे.◼️ लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत दररोज साधारण प्रत्येकी १० हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे.
हंगामाचे गणित बिघडले◼️ यंदा हवामान बदलाचा मोठा फटका सर्वच पिकांना बसला आहे. त्यातून कांद्याचे पीकही वाचलेले नाही.◼️ खरिपाचा कांदा सप्टेंबरनंतर बाजारात येतो, मात्र तो यंदा डिसेंबरमध्ये येण्याची चिन्हे आहेत.◼️ कांद्याची कुठे, किती लागवड झालेली आहे आणि किती उत्पादन होईल, याचा अंदाज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे लावणे कठीण झाले आहे.
यंदा सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. दिलासादायक म्हणजे उन्हाळ कांद्याचा डिसेंबरपर्यंत पुरवठा सुरू राहील, असा अंदाज आहे. तोपर्यंत नवा लाल कांदाही बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. त्यावेळेस मागणी-पुरवठ्याच्या गणितानुसार कांद्याचे भाव ठरतील. पुढील काही महिन्यांत मोठी भाववाढ होण्याची शक्यता दिसत नाही. फेब्रुवारीपर्यंत उन्हाळ कांदा बाजारात येईल. त्यामुळे यंदा पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. - नानासाहेब पाटील, माजी संचालक, नाफेड
अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर