गणेश घ्यार
सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्याकडे घेऊन जात आहेत. हिंगोलीतीलबाजार समितीमध्ये सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, तर शेजारील वाशिमच्या बाजार समितीत प्रति क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांनी अधिकचा भाव मिळत असल्याने हा बदल दिसून येत आहे.
हिंगोली बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला मिळणारा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. शेतमाल पिकवण्यासाठी झालेला खर्च आणि उत्पादन लक्षात घेता, सध्याचा भाव परवडणारा नसल्याचे मत अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असताना, वाशिमच्या बाजारपेठेत सोयाबीनला हिंगोलीच्या तुलनेत वाढीव दर मिळत आहे.
त्यामुळे, शेतकरी आता जवळपास ७०० ते एक हजार रुपयांचा अधिकचा फायदा मिळवण्यासाठी आपला वाहतूक खर्च वाढवूनही वाशिमच्या मोंढ्यात सोयाबीन विक्रीसाठी नेत आहेत. हिंगोली-वाशिम या दोन बाजार समित्यांमध्ये इतका मोठा दराचा फरक का आहे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
वाशिममध्ये शेतमालाची मागणी जास्त असणे किंवा व्यापाऱ्यांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद ही यामागील कारणे असू शकतात. दराच्या या तफावतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांना अधिक चांगल्या भावासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामुळे हिंगोली बाजार समितीनेदेखील दरामध्ये सुधारणा करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होण्यासाठी दरातील हा फरक दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा, शेतकरी आपला मोर्चा कायमस्वरूपी वाशिमच्या मोंढ्याकडे वळवण्याची शक्यता आहे.
बिजवाई : हिंगोलीत पाच तर वाशिममध्ये आठ हजार
हिंगोली येथील मोंढ्यात ८ नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनला ५ ते ५ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर वाशिममध्ये मात्र याच बिजवाईला ७ ते ८ हजारांचा भाव मिळाला. वाशिमच्या तुलनेत हिंगोलीत क्विंटलमागे बिजवाई सोयाबीन तीन हजार रुपयांनी कमीत खरेदी केली जात आहे. यावरून स्थानिक शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी आणावा की नाही? असा प्रश्न पडत आहे.
व्यापाऱ्यांची 'लॉबी' शेतकऱ्यांसाठी मारक
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात बोटावर मोजण्याएवढ्याच खरेदीदारांकडून शेतमालाची खरेदी होते. विशेष म्हणजे जे काही पाच-दहा खरेदीदार आहेत, त्यांची 'लॉबी' तयार झाली असून, शेतमालाचा भाव किती रुपयांपर्यंत वाढवायचा आणि किती पाडायचा? हे अगोदरच ठरविण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून नेहमीच होतो. 'लॉबी' वर बाजार समिती प्रशासनाने इलाज करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांवर अन्य बाजार समित्या जवळ करण्याची वेळ येऊ शकते.
