अयोध्याप्रसाद गावकर
देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे बागायतदार सांगतात. यावर्षी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये हापूस आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता.
मात्र, या मोहोराला फळधारणा कमी झाल्यामुळे यावर्षीचे उत्पादन कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला देवगड तालुक्यामध्ये नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबर महिन्यामध्ये सुमारे एकूण कलमांपैकी तालुक्यातील ८० टक्के कलमांना मोहोर आला होता.
यामुळे देवगड हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येणार असल्याचे दिसून येत असतानाच मोहोराला फळधारणा कमी झाली. त्यामुळे यावर्षीच्या एकूण आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस व फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अखेरच्या टप्प्यातील मोहरही कमी आला आहे. या मोहराला फळधारणा होणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, यावर्षी देवगड हापूस आंब्याचे एकूण उत्पादन गतवर्षीपेक्षा फारच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आलेल्या आंबा कलमांच्या मोहोरावरच एकूण उत्पादन असणार आहे. मात्र, हे चित्र मार्च महिन्याच्या पंधरवड्यातच दिसून येणार आहे.
फळधारणा कमी, उत्पादन कोलमडणार
१) पहिल्या टप्यातील आंबा कलमांना एकूण उत्पादनापैकी ३० टक्के मोहोर आला होता. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये २० टक्के मोहोर व उर्वरित तिसऱ्या टप्प्यातील मोहोर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये आला होता. या सर्व मोहोरांना गेल्यावर्षी समाधानकारक फळधारणा झाली होती.
२) यामुळे गेल्यावर्षी उत्पादनही चांगल्या प्रकारे आले होते. मात्र, यावर्षी नोव्हेंबर अखेरीस व डिसेंबर महिन्यामध्ये आलेल्या मोहोराला फळधारणा कमी झाली व काही मोहोर करपून गेला. सुरुवातीला तो फायदेशीर वाटला. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने यावर्षीचे एकूण उत्पादन याच कारणामुळे कोलमडणार आहे.
दरदिवशी ५० ते ६० पेट्या वाशी मार्केटला
सध्या देवगड तालुक्यामधून वाशी व अन्य बाजारपेठांमधून किरकोळ प्रमाणात आंबा विक्रीसाठी जात आहे. दरदिवशी तालुक्यामधून अंदाजे ५० ते ६० पेट्या वाशी मार्केटला रवाना होतात. सध्या देवगड हापूस ५ डझनी आंबा पेटीला ८ हजार ते १५ हजार रुपये वाशी मार्केटमध्ये भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, मुंबई येथे पिकलेला आंबा प्रति डझन ४ हजार रुपये किमतीने विक्री करीत आहेत.
कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे
दरवर्षी देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य आंबा विकला जातो. अश्या अनेक तक्रारी आहेत. यावर्षी तर देवगड हापूस आंब्याचे उत्पादन है कमी असल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली अन्य आंबा विक्री मोठ्या प्रमाणात बोगसरीत्या होऊ शकते. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
आंब्याच्या नावावर अन्य आंब्यांची विक्री
परदेशी व भारतीय मुख्य बाजारपेठांमध्ये देवगड हापूस आंब्याला मोठी मागणी असते. यामुळे गेल्या काही वर्षांत आंबा हंगामाच्या अखेरपर्यंत आंबा डझनाला ५०० ते ६०० रुपये, असा विक्रमी भाव मिळत होता. यावर्षी मात्र देवगड हापूसचे कमी उत्पादन असल्यामुळे मागणी एवढा पुरवठा करणे आंबा बागायतदारांना अशक्य होणार आहे. यामुळे देवगडच्या नावावर अन्य आंब्यांची विक्री होण्याची भीती आहे.