अशोक डोंबाळे
सांगली : येथील मार्केट यार्डात २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रतिक्विंटल हळदीला १८ ते ३२ हजारापर्यंत दर मिळाला होता. दरात तेजी कायम होती.
पण, हळदीच्या शुभारंभापासून १३ ते २१ हजार रुपयांपुढे दर जातच नाहीत. यामुळे हळदीची झळाळी कधी वाढणार, अशा प्रश्न हळद उत्पादकांना पडला आहे. सांगलीमार्केट यार्ड हळद, बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून देशभर परिचित आहे.
१५ जानेवारीपासून नवीन हळदी विक्रीसाठी सांगली मार्केट यार्डात नेहमी येती. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात मार्केट यार्डात १४ लाख ४९ हजार ५१ क्विंटल हळद पोत्यांची आवक झाली होती.
दि. १ एप्रिल २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत आठ लाख ८३ हजार ५२६ क्विंटल हळद पोत्याची आवक झाली आहे. अजून एक महिना असून, तीन ते चार लाख क्विंटलपर्यंत हळदीची आवक होऊ शकते. पण, मागील वर्षाच्या तुलनेत ही आवक कमी असेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ मधील सततच्या पावसामुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. परिणामी हळदीचे दर तेजीत राहतील, असा हळद उत्पादकांचा अंदाज होता.
परंतु, नवीन हळदीची आवक सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरी हळदीला झळाळी येत नाही, म्हणून शेतकरी संभ्रमात आहेत. सध्या कणी हळदीला प्रतिक्विंटल १३ ते १३ हजार ५०० रुपये दर मिळत आहे.
आवक कमी असतानाही दरात वाढ का नाही?
चांगल्या दर्जाच्या लगडी (जाड) हळदीला १८ हजार ५०० ते २१ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्या वर्षी लगडी (जाड) हळदीला प्रतिक्विंटल २५ ते ३२ हजार रुपयेपर्यंत दर मिळत होता. चांगल्या दर्जाच्या हळदीची आवक कमी असतानाही दरात वाढ का होत नाही, असा हळद उत्पादकांना प्रश्न पडला आहे.
५०% आवक कर्नाटकातून
सांगली मार्केट यार्डात सद्या १० ते १२ हजार क्विंटल हळदीची आवक होत आहे. जिल्ह्यात उत्पादन कमी असले, तरी कर्नाटकमधील विजापूर, बागलकोट, बेळगाव जिल्ह्यातून ५० टक्के हळदीची आयक होत आहे, असे सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.
हळदीचे असे आहेत दर (प्रतिक्विंटल)
लगडी (जाड) : १८,५०० ते २१,०००
मध्यम दर्जा : १४,५०० ते १६,०००
पावडर : १३,६०० ते १४,५००
कणी हळद : १३,००० ते १३,५००
मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यांत हळदीला प्रतिक्विंटल १८ ते ३२ हजारांपर्यंत दर मिळत होता. सरासरी दरही १५ हजार रुपयांपेक्षा जास्त होता. त्या तुलनेत यावर्षी हळदीची आवक कमी आहे, तरीही हळदीचे दर गेल्यावर्षीपेक्षा कमी आहेत. - महावीर पाटील, हळद उत्पादक
अधिक वाचा: Namo Shetkari Hapta : नमो शेतकरीच्या ६ व्या हप्त्याचा निर्णय झाला; हप्ता मिळणार का? वाचा सविस्तर