सांगली : जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला आहे. मागील आठवडाभरापासून बाजारात नवा गहू दाखल होत असून, गव्हाला सरासरी ३ हजार ५०० ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहेत.
पुढील काळात आणखी गव्हाची आवक वाढणार आहे. त्यामुळे गव्हाचे भाव उतणार की वाढणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
नोकरदार असो की सर्वसामान्य बाजारात नवा गहू दाखल झाल्यावर चार ते सहा महिने पुरेल एवढा गहू, ज्वारी खरेदी करून ठेवतात. आवक वाढत असल्याने गव्हाच्या भावात पुढील काही दिवसात घट झाल्याचे दिसू शकते.
वार्षिक धान्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग
नवा गहू बाजारात दाखल झाल्यामुळे खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. सध्या गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकरी नवा गहू आणत आहेत.
लोकल गहू खाण्यासाठी चवदार
जिल्ह्यात लोकल गव्हासह महाकाल, लोकवन गव्हाला चांगली मागणी आहे. हा गहू खाण्यासाठी चवदार असल्याने नागरिक या गव्हाची अधिक मागणी करताना दिसत आहेत.
पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक यंदा जोमदार
यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली होती. गव्हाला वातावरणही योग्य असल्याने गव्हाचे पीक चांगले बहरले होते. त्यामुळे यंदा गहू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन झाले. त्यांना फायदा होत आहे.
जिल्ह्यातील बाजारपेठेत गव्हाचे सध्याचे दर काय?
सांगली मार्केट यार्डामध्ये लोकलसह महाकाल, लोकवन गव्हाला चांगला भाव मिळत आहे. लोकवन, महाकाल गहू प्रतिक्विंटल तीन हजार ५०० ते ४ हजार रुपये दराने विक्री होत आहे. याशिवाय लोकल गव्हालादेखील बाजारात मागणी असून, चांगला भावदेखील मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.
गहू साठविताना काय काळजी घ्याल?
गव्हाची दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी गव्हात कडू लिंबाची पाने शेतकरी टाकून ठेवतात. तसेच गव्हाला कोरड्या जागेवर त्याची साठवणूक केली जाते. कीड लागणार नाही, यासाठी बाजारात पावडर मिळते. त्याचादेखील अनेक शेतकरी उपयोग करताना दिसून येत आहेत.
अधिक वाचा: सोलापूर बाजार समितीत एका दिवसात तब्बल सव्वादोन कोटींचा बेदाणा विकला; कसा मिळतोय दर?