पुणे शहरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट, आरास आणि आरती साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी फुलांची आरास महत्त्वाची असल्याने मार्केट यार्डातील फुलबाजार मंगळवारी गर्दीने फुलून गेला होता. मार्केट यार्डात फुलांची दुप्पट आवक झाल्याने फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती.
लाल, पिवळी, नारिंगी झेंडूची फुले, जाई-जुई, गुलाब, कमळ, पाने, मोगऱ्याच्या माळा, शेवंती, गुलछडीसह विविध रंगीबेरंगी फुलांना मागणी वाढली आहे. भाविकांनी फुलांच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती.
पावसामुळे भिजली फुले
◼️ पावसांमुळे फुले भिजली असल्याने सुक्या फुलांना मागणी वाढली आहे. यामुळे सुक्या फुलांचे दर तेजीत होते.
◼️ यंदा पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवात फुलांचे दर तेजीत राहणार आहेत.
◼️ गौरी आगमनाला फुलांच्या मागणीत वाढ होणार आहे.
◼️ मार्केटयार्ड व महात्मा फुले मंडई परिसरात फुले खरेदीसाठी गर्दी झाली होती.
बाप्पांच्या पूजेसाठी दुर्वा, फुलांना मागणी
गणरायांची आज प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने नागरिकांनी पूजेचे साहित्य तसेच फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. लाल, पिवळी, नारिंगी झेंडूची फुले, जाई-जुई, गुलाब, कमळ, पाने, मोगऱ्याच्या माळांना मागणी होती.
फुलांचे प्रतिकिलोचे दर (रुपये)
जुई - १३०० ते १४००
झेंडू - ८० ते १२०
गुलछडी - ६०० ते १४००
ऑर्किड - ५०० ते १०००
शेवंती - ८० ते ३५०
अष्टर - १५० ते ३५०
गुलाब गड्डी - ४० ते ६०
डच गुलाब - १०० ते २००
जरबेरा - ५० ते १००
सकाळपासून गणेश स्वागतासाठी आतापासून हार बनवण्यासाठी मंगळवारी झेंडू आणि मोगऱ्याच्या फुलांना ग्राहकांकडून मागणी होती. १०० ते १५० रुपयांना झेडू फुलांचा दर होता तर शेवंती १५० ते ४५० रुपये भाव आहे. तरी ही ग्राहक शोभिवंत फुले खरेदीसाठी गर्दी करीत होते. - अण्णा कदम, विक्रेते
शेतकऱ्यांकडून मंगळवारी बाजारात विक्रीस पाठविणाऱ्या फुलांमध्ये भिजलेल्या फुलांचे ५० टक्के प्रमाण होते. यामुळे ओल्या फुलांना दर कमी मिळाले आहेत. तर सुक्या फुलांचे दर तेजीत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी दुप्पट फुलांची आवक झाली आहे. - सागर भोसले, फूल व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
अधिक वाचा: शेतजमीन सातबारा, नकाशा व इतर महसूल सेवांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आता झटपट; वाचा सविस्तर