आवक व मागणी नसल्याने सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या फुलांच्या बाजारात उलाढाल थंडावली आहे. झेंडू, शेवंती, निशिगंध या फुलांच्या दरात घट झाली आहे. फुलांना दर नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना श्रावण महिन्याची प्रतीक्षा आहे.
मे महिन्यात फुलांना मागणी नसल्याने मिरजेतील बाजारात निशिगंध, झेंडू, शेवंती, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, या हरितगृहातील फुलांची आवक घटली आहे. लग्नसराई संपत आली आहे, त्यातच अवकाळी पावसाने फुलांची आवक कमी आहे.
यावर्षी मे महिन्यात अवकाळीनेही फुलांचे उत्पादनावर परिणाम झाला आहे. मे महिन्यात मोठे सण-उत्सव नसल्याने फुलांना मागणी नाही. यामुळे फुलांच्या बाजारात झेंडूचा दर प्रतिकिलो तीस रुपयांपर्यंत उतरला आहे.
शंभर रुपये प्रतिकिलो विक्री होणारी शेवंती व दोनशेवर असलेल्या निशिगंधाचा दर ५० ते ६० रुपयांवर आहे. गुलाबाचा दर प्रतिशेकडा दोनशेपर्यंत आहे. फुलांचे दर कमी असूनही बाजारात मागणी नाही. मिरजेतून मोठ्या शहरात फुलांची निर्यात होते. मात्र, मागणी नसल्याने उलाढाल थंडावली आहे.
फुलांचे सध्याचे दर
निशिगंध - ६० रुपये किलो
झेंडू - ३० रुपये किलो
गुलाब - २०० रुपये शेकडा
शेवंती - ६० रुपये किलो
डच गुलाब (२० फुलांची पेंडी) - १५०
हेही वाचा : तुम्ही पित असलेल्या पाण्याचा टीडीएस योग्य नसेल तर उद्भवू शकतो आजार? वाचा सविस्तर